प्रभारी शल्यचिकित्सक डॉ. आरती कुलवाल:डॉ. पटोकार, डॉ. वाडेकर लेडी हार्डिंगमध्ये
अकोला जिल्हा स्त्री रुग्णालयातील (लेडी हार्डिंग) विशेष नवजात शिशू देखभाल युनिटमध्ये सहायक कर्मचारी परिचारिका भरतीसाठी राबवण्यात आलेल्या ई-निविदा प्रक्रियेत नियमबाह्य पद्धतीचा अवलंब केल्याप्रकरणी जिल्हा शल्य चिकित्सकांसह तीन अधिकारी निलंबित झाल्यानंतर आरोग्य विभागाकडून पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे. जिल्हा शल्यचिकित्सक पदाचा प्रभार सहायक संचालक डॉ. आरती कुलवाल, जिल्हा स्त्री रुग्णालय अधीक्षक पदाचा प्रभार अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वंदना पटोकार (वसू) तर प्रशासकीय अधिकारी पदाचा प्रभार डॉ. वाडेकर यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या नवजात शिशू अतिदक्षता विभागात परिचारिका भरती प्रक्रियेतील निविदा घोटाळ्याच्या प्रकरणात जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, जिल्हा स्त्री रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. जयंत पाटील व प्रशासकीय अधिकारी ए. एन. डांबरे यांच्यावर गेल्या शुक्रवारी निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. अकोला परिमंडळाचे आरोग्य उपसंचालक डॉ. कमलेश भंडारी यांनी सोमवारी या निलंबित अधिकाऱ्यांच्या जागेवर तात्पुरते प्रभारी अधिकारी नियुक्त केले आहेत. नवजात शिशु विभागातील ३१ पदांच्या भरतीसाठी करण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेमध्ये नियमबाह्य पद्धतीचा अवलंब झाल्याचा ठपका ठेवत तीन अधिकाऱ्यांना निलंबित करत मुख्यालयात अटॅच करण्यात आले. या प्रक्रियेत फक्त निवडक ठेकेदारांना लाभ देण्यासाठी चुकीच्या पद्धतीने निविदा प्रक्रिया राबवण्यात आल्याचा आरोप वाशीमचे भाजप आमदार श्याम खोडे यांनी विधिमंडळात केला होता. त्यानंतर विभागीय चौकशी समितीची स्थापना झाली होती. जिल्हा स्त्री रुग्णालयातील विशेष नवजात शिशू काळजी युनिट मध्ये सहायक कर्मचारी परिचारिकांसाठी ३१ पदांसाठी काढलेल्या ई-निविदेत अपारदर्शकता आणि अनियमितता होती. चौकशीत हे स्पष्ट झाले. चौकशीत दोषी आढळलेले जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारेंसह तिघा अधिकाऱ्यांचे निलंबन महाराष्ट्र सरकारी नागरी सेवा कायदा १९७९ च्या नियम ४(१)(अ) च्या कलम ४(१)(अ) अंतर्गत करण्यात आले आहे.

What's Your Reaction?






