महादेव मुंडे हत्या प्रकरण:मुख्य आरोपी देशाबाहेर पळून जाण्याच्या तयारीत, रोहित पवारांचा दावा; आतापर्यंत चौघांना अटक
परळीतील व्यापारी महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणाचा तपास आता वेग घेत असून, राज्य सरकारने या प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटी स्थापन केली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या दोन पथकांकडूनही महादेव मुंडेंच्या आरोपींचा शोध सुरू आहे. दरम्यान, या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी मोठा दावा केला आहे. महादेव मुंडे प्रकरणातील संशयित मुख्य आरोपी देश सोडून पळून जाण्याच्या तयारीत असल्याची शक्यता असल्याचे रोहित पवार यांनी म्हटले आहे. महादेव मुंडे हत्या प्रकरणात सुमारे दीड वर्षांनी 4 आरोपींना अटक करण्यात आली आहे. महादेव मुंडे यांच्या पत्नीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी ही कारवाई झाली. या प्रकरणी आरोपींची नावे कळली नाहीत. असे असले तरी महादेव मुंडे हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही. अशात आता रोहित पवार यांनी उपरोक्त दावा केला आहे. नेमके काय म्हणाले रोहित पवार? रोहित पवार यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, "महादेव मुंडे हत्या प्रकरणात मुंडे कुटुंबियांना ज्या आरोपीवर मुख्य संशय आहे, तो आरोपी देश सोडून जाण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती कळत असून पोलिस यंत्रणांनी यासंबंधित खातरजमा करून त्वरित कारवाई करणे गरजेचे आहे. आज उद्या पोलिसांनी या आरोपीच्या मुसक्या आवळल्या नाही तर आरोपी पसार होण्याची शक्यता आहे." मुंडे कुटुंबाला मुख्यमंत्री साहेबांनी दिलेल्या आश्वासनानुसार एसआयटीमध्ये पोलिस अधिकारी संतोष साबळे यांचा अद्यापही समावेश झालेला नाही, तपासाला गती देण्यासाठी त्यांचा एसआयटीमध्ये त्वरित समावेश करावा', अशी विनंती देखील रोहित पवार यांनी केली आहे. पोलिस गोट्या गित्तेच्या शोधात या हत्येतील मुख्य संशयित आरोपीचे नाव रोहित पवार यांनी जाहीरपणे घेतलेले नसले तरी, गोट्या गित्तेचा उल्लेख सातत्याने या प्रकरणात केला जात आहे. तसेच, वाल्मिक कराड यांच्या दोन मुलांचाही या हत्येत सहभाग असल्याच्या चर्चा सुरू आहेत. पोलिस गोट्या गित्तेच्या मागावर असून, त्याच्या शोधासाठी पथके रवाना केली आहेत. दरम्यान, गोट्या गित्तेने एक व्हिडिओ जारी करून "आपल्यावर खोटे आरोप होत असून, मानसिक छळ वाढल्यास आत्महत्या करणार" अशी धमकी दिली आहे. पंकज कुमावतांचा एसआयटीत समावेश महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी पोलिस अधिकारी पंकज कुमावत आणि संतोष साबळे यांचा एसआयटीमध्ये समावेश करावा, अशी विनंती केली होती. त्यानुसार पंकज कुमावत यांच्या नेतृत्वाखाली एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे. मात्र, संतोष साबळे यांचा समावेश अद्यापही करण्यात आलेला नाही.

What's Your Reaction?






