शिक्षणाचे बाजारीकरण, रोजगाराच्या हक्कासाठी लढाई तीव्र करण्याची गरज:डॉ. अजित नवले यांचे प्रतिपादन, एसएफआयच्या 19 व्या राज्य अधिवेशनास नांदगावात प्रारंभ
स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय) च्या १९ व्या महाराष्ट्र राज्य अधिवेशनास नांदगाव खंडेश्वर येथे उत्साहात सुरुवात झाली. सकाळी ११ वाजता एसएफआयचे राष्ट्रीय महासचिव मयुख बिश्वास यांनी उद्घाटन केले. या वेळी स्वागताध्यक्ष, भारतीय महाविद्यालयाचे प्रा. डॉ. प्रशांत विघे यांनी राज्यभरातून आलेल्या प्रतिनिधींचे स्वागत केले. तर सायंकाळी ६ वाजता राज्य अधिवेशनाची जाहीर सभा नांदगाव खंडेश्वर येथे प्रचंड उत्साहात पार पडली. या सभेला शेकडो विद्यार्थी, युवक आणि नागरिक उपस्थित होते. डॉ. अजित नवले यांनी शेतकरी आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची सांगड घालत, सध्याच्या कृषी धोरणांवर सडकून टीका केली. ते म्हणाले, ज्याप्रमाणे शेतकऱ्यांना त्यांच्या कष्टाचे योग्य मोल मिळत नाही, त्याचप्रमाणे आज विद्यार्थ्यांनाही शिक्षणाचा होत असलेल्या बाजारीकरणामुळे शिक्षण नाकारले जात आहे. बेरोजगारीमुळे तरुण हवालदिल झाले आहेत. त्यामुळे शिक्षण व रोजगारासाठी लढाई तीव्र करण्यासाठी शेतकरी आणि विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन आपल्या हक्कांसाठी संघर्ष करण्याचे आवाहन केले. या सभेच्या अध्यक्षस्थानी एसएफआयचे राज्याध्यक्ष सोमनाथ निर्मळ हे होते. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे (माकप) आ. विनोद निकोले, अखिल भारतीय किसान सभेचे राज्य सरचिटणीस डॉ. अजित नवले आणि एसएफआयचे राष्ट्रीय महासचिव मयूख बिश्वास यांनी सभेला संबोधित केले. ज्यातून सध्याच्या शिक्षण व्यवस्थेतील त्रुटी, वाढती बेरोजगारी आणि शेतकरी-कामगारांच्या समस्यांवर तीव्र प्रकाश टाकण्यात आला. विनोद निकोले यांनी आपल्या भाषणात, शिक्षण हे प्रत्येक विद्यार्थ्याचा मूलभूत हक्क असून, ते व्यावसायिक आणि खासगीकरणाच्या विळख्यातून बाहेर काढण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन केले. ते म्हणाले, सरकारने शिक्षणाचे बाजारीकरण थांबवून, सर्वांना समान आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध करून द्यावे. आज ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. ज्याकडे दुर्लक्ष करणे हे देशाच्या भवितव्यासाठी धोकादायक आहे. तसेच एसएफआयचे राष्ट्रीय महासचिव मयूख बिश्वास यांनी केंद्र सरकारच्या धोरणांवर जोरदार हल्ला चढवला. देशातील तरुणाईला रोजगार नाही, शिक्षण महाग झाले आहे आणि शिक्षण संस्थांचे भगवीकरण केले जात आहे. एसएफआय या अन्यायाविरुद्ध सातत्याने संघर्ष करत राहील. विद्यार्थ्यांचे भविष्य सुरक्षित करणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे, असे ते म्हणाले. या वेळी स्वागत समितीचे कोषाध्यक्ष श्याम शिंदे यांनी सर्वांचे स्वागत केले. या वेळी सुभाष पांडे, रमेश सोनुले, महादेव गारपवार, ज्ञानेश्वर शिंदे उपस्थित होते. रामदास मते, अशोक केसरखाने, दिलीप महले, अनिल मारोटकर, मोहसीन शेख, कानतेश्वर पुंड, राजेंद्र राऊत, दीपक अंबाडरे, मिलिंद चौरे, राजगुरू शिंदे, आशिष रावेरकर, मारुती बंड, राम शिंदे यांच्यासह इतर कार्यकर्त्यांनी रॅली व सभेसाठी प्रयत्न केले. प्रास्ताविक एसएफआयचे राज्य सचिव रोहिदास जाधव यांनी केले. आभार एसएफआय अमरावती जिल्हाध्यक्ष चैतन्य साळवन यांनी मानले.

What's Your Reaction?






