उद्धव ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्याआधीच एकनाथ शिंदेही दिल्लीत:8 दिवसांत दुसऱ्यांदा राजधानीत, राजकीय चर्चांना उधाण
महाराष्ट्राच्या राजकारणात पडद्यामागे मोठ्या घडामोडी सुरू असल्याच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आले आहे. शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे बुधवारी दिल्ली दौऱ्यावर जाणार असतानाच, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेदेखील अचानक आज रात्री पुन्हा दिल्ली दौऱ्यावर रवाना होणार आहेत. एका आठवड्याच्या आत शिंदेंचा हा दुसरा दिल्ली दौरा असल्याने याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज रात्री उशिरा दिल्लीला पोहोचणार असून, उद्या दिवसभर त्यांच्या विविध बैठका आयोजित करण्यात आल्या आहेत. या बैठकांमध्ये शिवसेना (शिंदे गट) च्या खासदारांसोबत ते आगामी रणनीतीवर चर्चा करणार आहेत. शिंदेंचा हा दौरा उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याआधीच होत असल्याने राजकीय टायमिंग-वर अनेक चर्चा सुरू झाल्या आहेत. विशेषतः, शिंदे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. काही दिवसांपूर्वीच शिंदेंनी रात्री उशिरा शहा यांची भेट घेतली होती, ज्यामुळे राज्यात मोठी खळबळ उडाली होती. उद्धव ठाकरेंचा 'इंडिया' आघाडी दौरा उद्धव ठाकरे 6 ऑगस्टला दिल्लीत पोहोचणार असून, 7 ऑगस्टला होणाऱ्या 'इंडिया' आघाडीच्या बैठकीत सहभागी होणार आहेत. या बैठकीत ते आघाडीच्या प्रमुख नेत्यांशी संवाद साधणार आहेत. तसेच, पावसाळी अधिवेशनाच्या निमित्ताने दिल्लीत असलेल्या आपल्या पक्षाच्या खासदारांचीही ते बैठक घेणार आहेत. या दौऱ्यात त्यांना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्नेहभोजनाचे निमंत्रण दिले असून, ठाकरे त्यांच्या निवासस्थानी जाणार असल्याची माहिती आहे. या स्नेहभोजनासाठी महाराष्ट्रातून उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत (शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे) तसेच शरद पवार आणि सुप्रिया सुळे (राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार) उपस्थित राहणार आहेत. 'इंडिया' आघाडीच्या इतर राज्यांतील सर्व प्रमुख नेत्यांनाही या बैठकीचे निमंत्रण पाठवण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी लांबणीवर? दरम्यान, शिवसेना पक्ष आणि चिन्हासंबंधी सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीचे वेळापत्रक बदलण्याची शक्यता आहे. न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर 20 ऑगस्टला सुनावणी निश्चित होती. मात्र त्या दिवशी न्यायमूर्ती कांत हे घटनापीठाचे सदस्य बनणार असल्याने ते शिवसेना पक्ष आणि चिन्हाची सुनावणी घेऊ शकणार नाहीत. त्यामुळे आता शिवसेनेच्या विनंतीवरून पक्ष आणि चिन्हाची सुनावणी एकतर 20 ऑगस्टपूर्वी होऊ शकेल किंवा त्यानंतरची पुढची ‘तारीख’ मिळण्याची चिन्हे आहेत.

What's Your Reaction?






