कोषागार कार्यालयात जिजाऊ भवनाचे उद्घाटन:पालकमंत्र्यांच्या हस्ते झाले उद्घाटन, मान्यवरांची उपस्थिती, मार्गदर्शन
येथील कोषागार कार्यालयात सभागृहाची अडचण होती. अधिकारी-कर्मचाऱ्यांची संयुक्त बैठक घ्यायची असल्यास दोन वेगवेगळ्या स्थळांचा आधार घ्यावा लागत होता. त्यावर मात करण्यासाठी राजमाता जिजाऊ यांच्या नावाने नवे सभागृह तयार करण्यात आले आहे. कोषागार कार्यालयाच्या परिसरातील या सभागृहाचे उद्घाटन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार सुलभाताई खोडके, आमदार संजय खोडके, आमदार प्रताप अडसड, जिल्हाधिकारी आशिष येरेकर, लेखा व कोषागारे सह संचालक प्रिया तेलकुंटे, वरिष्ठ कोषागार अधिकारी शिल्पा पवार, सहाय्यक संचालक (निवृत्ती वेतन) अमोल ईखे आदी मान्यवर उपस्थित होते. सदर सभागृहासाठी जिल्हा नियोजन समितीतून (डीपीसी) ६८ लाख रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. दरम्यान जिल्ह्यातील विकास प्रकल्प पूर्ण करण्यासाठी वेळोवेळी भरीव निधी उपलब्ध करुन दिला जाईल, असे आश्वासन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी दिले. जिल्हा कोषागार कार्यालयाच्या परिसरात नव्याने उभारण्यात आलेल्या या सभागृहात सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. या सभागृहात लेखा व कोषागार विभागाद्वारे राबवण्यात येणाऱ्या नवीन प्रणालीचे प्रशिक्षण, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठीच्या त्रैमासिक सभा, आरोग्य शिबीरे, योग- प्राणायम शिबीरे आदी उपक्रम घेण्यात येतील, असे प्रास्ताविकादरम्यान स्पष्ट करण्यात आले. कार्यालयाचाही होणार कायापालट जिल्हा कोषागार कार्यालयाची इमारत ही ४० वर्ष जुनी आहे. त्यामुळे ती कालबाह्यतेच्या उंबरठ्यावर उभी असून नव्या इमारतीची गरज त्यामुळेच निर्माण झाली आहे. तसा प्रस्तावही वरिष्ठ कोषागार अधिकारी शिल्पा पवार यांनी पालकमंत्र्यांसमोर ठेवला. विशेष असे की आमदार सुलभाताई खोडके यांनीही त्यांची बाजू उचलून धरली. त्यामुळे येत्या काळात नव्या इमारतीसाठीही निधी दिली जाईल, असे आश्वासन पालकमंत्री बावनकुळे यांनी दिले.

What's Your Reaction?






