महापालिका आयक्तांकडून आढावा:भुयारी गटाराचे योग्य नियोजन करा; मनपा आयुक्तांचे ‘मजीप्रा’ला निर्देश, शहरात साफसफाई आणि अतिक्रमण विरोधी मोहीम
अमरावती शहरातील नाल्यांसह स्वच्छतेची पाहणी करताना भुयारी गटारीचे योग्य नियोजन करण्याचे निर्देश मनपा आयुक्तांद्वारे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांना देण्यात आले. परिसरातील नालीचे बांधकामांबाबत व नाल्यांचे नियमित देखरेख करण्याचे निर्देश त्यांनी या वेळी अभियंत्यांना दिले. मनपा आयुक्त सौम्या शर्मा यांनी मंगळवारी ५ ऑगस्टला सकाळी ७.३० वाजता बेलपुरा रोड, कंवर नगर, अंबिका नगर व राजापेठ या परिसरात स्वच्छता व अतिक्रमण संदर्भातील परिस्थितीचा प्रत्यक्ष आढावा घेतला.पाहणी दरम्यान आयुक्तांनी संबंधित विभाग प्रमुखांना स्वच्छते बाबत अधिक दक्षता घेण्याचे निर्देश दिले. तसेच, अनधिकृत अतिक्रमण झोनमध्ये येणाऱ्या ठिकाणी तातडीने कारवाई करण्याचे आदेशही त्यांनी दिले. नागरिकांना स्वच्छता राखण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन करत, सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकल्यास दंडात्मक कारवाई केली जाईल असेही त्यांनी सांगितले. महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने काही ठिकाणी अनधिकृत टपऱ्या व बांधकामांचे सर्वेक्षण सुरू केले असून, येत्या काही दिवसांत नियोजित कारवाई करण्यात येणार आहे. ही पाहणी मोहीम महानगरातील नागरी सुविधा, स्वच्छता व वाहतुकीचा सुलभ प्रवाह सुनिश्चित करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरत आहे. यावेळी आयुक्तांनी परिसरातील नागरिकांशी संवाद साधुन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या व सदर परिसरातील नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करण्याचे निर्देश दिले. स्वच्छता व्यवस्था सुधारण्यासाठी तात्काळ उपाययोजना कराव्यात. नियमित साफसफाई सुनिश्चित करावी. कचरा उचलण्यासाठी पुरेशा संख्येने वाहनांची आणि कर्मचाऱ्यांची नेमणूक करावी. अनधिकृत अतिक्रमणांवर कठोर कारवाई करा. मुख्य रस्ते व सार्वजनिक स्थळांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी विशेष मोहीम राबवावी. अतिक्रमण करणाऱ्यांना पूर्वसूचना देऊन नंतर तातडीने कारवाई करावी. नागरिकांना जनजागृतीद्वारे सहभागी करून घ्या. स्वच्छतेबाबत जनजागृती मोहिमा चालवा. स्थानिक रहिवाशांना अडचणी असल्यास त्यांची माहिती घेऊन तत्काळ उपाय सुचवावेत. दंडात्मक कारवाईला गती द्या. सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर दंड लावण्यात यावा. नियमित गस्तीद्वारे उल्लंघन करणाऱ्यांवर नियंत्रण ठेवा. प्रत्येक विभागाने जबाबदारीने काम करावे. संबंधित क्षेत्रीय अधिकारी व कर्मचारी यांना त्यांच्या कामगिरीसाठी उत्तरदायी धरण्यात येईल. कामात हलगर्जीपणा आढळल्यास कारवाई केली जाईल, असे आदेशही आयुक्तांनी दिले. या पाहणी दरम्यान वैद्यकीय अधिकारी डॉ.अजय जाधव, सहाय्यक आयुक्त भुषण पुसतकर, ज्येष्ठ आरोग्य निरीक्षक विजय बुरे, आरोग्य निरीक्षक, मनपा कर्मचारी उपस्थित होते. मनपा आयुक्तांनी शहरातील स्वच्छता व अतिक्रमणाचा आढावा घेतला.

What's Your Reaction?






