धनंजय मुंडेंना मंत्रिपद द्यायचे स्वप्नातही आणू नका:मनोज जरांगेंचा सरकारला इशारा; म्हणाले - मी थकलो, थोड्या दिवसांचा पाहुणा!
आमदार धनंजय मुंडे यांना पुन्हा मंत्रिपद देण्याची गोष्ट स्वप्नातही आणू नका, असा निर्वाणीचा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी गुरूवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारला दिला. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणाचा हा शेवटचा लढा असल्याचेही नमूद केले. ही आपली शेवटची लढाई आहे. मी थकलो आहे. समाजाचा थोड्या दिवसांचा पाहुणा राहिलो आहे, असे ते म्हणाले. राज्याच्या राजकीय वर्तुळात माजी मंत्री धनंजय मुंडे यांची पुन्हा एकदा मंत्रिपदी वर्णी लागण्याची चर्चा सुरू झाली आहे. स्वतः राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तसे संकेत दिलेत. पत्रकारांनी गुरूवारी सांगलीच्या दौऱ्यावर असणाऱ्या मनोज जरांगे पाटलांना याविषयी प्रतिक्रिया विचारली. त्यावर त्यांनी धनंजय मुंडे यांना मंत्रिपद देण्याची गोष्ट स्वप्नातही आणू नका असे ठणकावून सांगितले. बीडमधील गुन्हेगारी थांबणे तूर्त अवघड आहे. हे संपण्यास आणखी 20 वर्षे लागतील. या लोकांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला रस्त्यावर आणले. त्यामुळे पालकमंत्री अजित पवारांनी केवळ बीडमध्ये येऊन चालणार नाही, तर तेथील प्रशासनावर वचक ठेवण्याची गरज आहे. मी थकलो, शरीर साथ देत नाही ते पुढे म्हणाले, पश्चिम महाराष्ट्र एकजूट होत नसल्याचे आतापर्यंत सांगितले जात होते. पण माझ्या 3 बैठका या भागात झाल्या. ही चपराक आहे. येथील सर्व मराठा एकजूट आहे. त्यामुळे मुंबईला 5 पट लोक येणार. सांगली ही क्रांतीकारकांची भूमी आहे. त्यामुळे क्रांतीत हा जिल्हा मागे राहील हे शक्य नाही. येथे एक घर एक गाडी ही मोहीम सुरू होईल. मुंबईच्या आंदोलनात 100 टक्के मराठा समाज दिसणार. आम्ही कायदा मोडणार नाही. ही शेवटची लढाई आहे. मी आता थकलो आहे. शरीरही साथ देत नाही. मी समाजाचा फार थोड्या दिवसांचा पाहुणा राहिलो आहे, असे ते म्हणाले. आरक्षण मिळेपर्यंत मुंबई सोडणार नाही आत्ताची लढाई विक्रमी होईल. सर्वजण शांततेत मुंबईला जातील. कुणी कुठेही जाळपोळ करायची नाही. सरकारने एखादा डाव टाकण्याचा प्रयत्न केला तर पाहू. यावेळी ओबीसी आरक्षण व सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी घेतल्याशिवाय मागे हटणार नाही. पण काही गोष्टी जबाबदारीने कराव्या लागतात. लोकशाहीच्या आधारावर व कायद्याच्या आधारावर आम्हाला मराठा आरक्षण मिळेल. हे आरक्षण मिळेपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाही. मराठा नेत्यांनी एकजूट व्हावे मनोज जरांगे यांनी यावेली मराठा नेत्यांवरही सडकून टीका केली. ते म्हणाले, समाजाने ज्या नेत्यांना मोठे केले, ते आता त्यांच्याकडे फिरूनही बघत नाही. त्यामुळे त्यांनी आता समाजासाठी एकत्र यावे. समाजाच्या शेवटच्या लढ्यासाठी साथ द्यावी, असे ते म्हणाले.

What's Your Reaction?






