कंत्राटदारांची थकित देयके अदा करा:युवक काँग्रेसचे अमरावतीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
अमरावती येथे कंत्राटदारांची थकित देयके त्वरित अदा करण्याच्या मागणीसाठी युवक काँग्रेसने गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने केली. युवक काँग्रेसचे पुढारी समीर जवंजाळ आणि वैभव देशमुख यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले. कंत्राटदारांची देयके अडल्यामुळे अनेक ठिकाणची लोकोपयोगी कामे थांबवावी लागली आहेत. परिणामी ग्रामीण आणि शहरी भागाचा विकास थांबला आहे. ज्या कंत्राटदारांनी सरकारी विभागाची कामे प्रामाणिकपणे पूर्ण केली, ते महिनोन्महिने थकित बिलांच्या प्रतीक्षेत आहेत. अनेक कंत्राटदारांनी बँकांकडून कर्ज घेतले आहे. काहींनी घरे गहाण ठेवली आहेत. अनेकजण कर्जबाजारी झाले आहेत. आंदोलनकर्त्यांनी हे सरकारच्या आणि प्रशासकीय यंत्रणेच्या निष्क्रियतेचे उदाहरण म्हणून सांगितले. विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर केवळ २० हजार कोटी हाती असताना तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनी ६४ हजार कोटींची कामे करवून घेतली. राज्यभर या कामांचे भूमिपूजन पार पडले. आता मात्र शासनाकडे निधी नसल्याच्या कारणावरून कंत्राटदारांची देयके अडवून ठेवण्यात आली आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाकडे ४६ हजार कोटींची देयके थकीत असून त्यामध्ये सामान्य कंत्राटदार भरडले जात आहेत. आंदोलनकर्त्यांनी सांगली येथे आत्महत्या करणारे तरुण कंत्राटदार हर्षल पाटील यांच्या प्रकरणाचाही उल्लेख केला. हर्षल पाटील यांनी जलजीवन मिशन अंतर्गत १.४० कोटी रुपयांचे काम पूर्ण केले होते. परंतु शासनाकडून बिल न मिळाल्यामुळे ते तणावात होते आणि त्यांनी आत्महत्या केली. आंदोलनकर्त्यांनी हर्षल पाटील यांच्या आत्महत्येची सखोल चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली. तसेच त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत पुरवावी आणि देयके अदा करण्यासाठी निश्चित कालमर्यादा असलेली पारदर्शक कार्यपद्धती लागू करण्यात यावी अशीही मागणी केली. आंदोलनात अनेकेत ढेंगळे, सागर कलाने, आशिष यादव, अक्षय साबळे, संकेत साहू, आकाश गेडाम, शुभम बांबल, वेदांत केने, अमेय देशमुख, कुणाल गावंडे, धनंजय बोबडे, निशांत देशमुख, हर्षल रोंघे, केदार भेंडे, हर्षल साखरकर, व्यंकटेश मेटकर आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.

What's Your Reaction?






