महसूल सप्ताहाचा शुभारंभ:महसूल विभागाने लोकाभिमुख आणि पारदर्शक पद्धतीने काम करावे, अजित पवार यांचे आवाहन
केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून जिल्ह्यात विविध विकासकामे करण्यात येत असून महसूल विभागाने लोकाभिमुख, पारदर्शक आणि गतीमान पद्धतीने विकासकामे वेळेत मार्गी लावण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केले. विभागीय आयुक्तालय येथे महसूल सप्ताहाचा शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार चेतन तुपे, बापूसाहेब पठारे, शंकर मांडेकर, विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, अतिरिक्त आयुक्त कविता द्विवेदी, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, अपर आयुक्त तुषार ठोंबरे आदी उपस्थित होते. अजित पवार म्हणाले, स्वातंत्र्यपूर्व काळापासून महसूल विभाग हा महत्वाचा विभाग म्हणून ओळखला जातो. हा विभाग प्रशासनाचा कणा म्हणून कार्यरत आहे. अतिवृष्टी, पूरपरिस्थिती, नैसर्गिक आपत्तीच्या काळात महसूल विभाग नागरिकांना दिलासा देण्याचे काम करीत असतो. इतर विभागांनाही सोबत घेवून लोककल्याणकारी योजना, ध्येयधोरणे, उपक्रमांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासोबतच प्रशासकीय गतिमानता आणण्याकरता महसूल विभागाने काम करावे. कोरोनाच्या काळात महसूल विभागाने आणि इतर सर्व सबंधित विभागाने उत्तम कामे करुन संकटाशी सामना केला,यांची नोंद नागरिकांनी घेतलेली आहे,असेही ते म्हणाले. राज्यशासनाच्या वतीने नागरिकांना पारदर्शक सेवा देण्यावर भर देण्यात येत आहे. गावपातळीपासून ते जिल्हा पातळीपर्यंत महसूल विभागाशी नागरिकांशी दैनंदिन संबंध येत असतो.त्यामुळे आपण कोणत्याही प्रबोलनास बळी न पडता नागरिकांना गुणवत्तापूर्ण, पारदर्शक सेवा द्यावी, कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना चांगली वागणूक द्यावी. चांगले काम करुन महसूल विभागासह राज्य शासनाप्रती नागरिकाच्या मनात उंचावण्याचे काम केले पाहिजे. आगामी काळात नागरिकांना अधिकाधिक ऑनलाईन सेवा देण्यावर भर देण्यात येणार येणार असून नागरिकांनाही या सेवांचा लाभ घेवून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. सर्व विभागांच्या सहभागाने महसूल सप्ताह यशस्वी करा महसूल सप्ताह महसूल विभागापुरता मर्यादित न ठेवता सर्व विभागांना सहभागी करुन यशस्वी करावा आणि सप्ताहाच्या निमित्ताने सर्वसामान्य नागरिकांची कामे गतीने पूर्ण करावीत. महसूल सप्ताहामध्ये सर्व संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी चांगले कामे करावे.राज्य शासनाच्या वतीने १०० दिवसाचा कृती कार्यक्रम राबवण्यात आला, आता १५० दिवसांचा कृती आराखडा राबवण्यात येत आहे, यामध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग होवून कामे करावीत,असेही पवार म्हणाले. शासकीय कामकाजात तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यावर भर द्यावा महसूल विभागाच्या अधिकाधिक सेवा ऑनलाईन झाल्या आहेत, नागरिकांना या सेवांचा प्रभावीपणे, पारदर्शकरीत्या लाभ देण्याकरिता अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शासकीय कामकाजात ई-प्रणाली, एआयचा प्रभावीपणे वापर केला पाहिजे. आपल्या पदाचा लोककल्याणाकरिता उपयोग झाला पाहिजे,अशी भावना ठेवून जबाबदारी पूर्वक कामे केली पाहिजे. नागरिकांची कामे कायद्याच्या चौकटीत बसवून ही कामे वेळेत होवून त्यांचा वेळ व खर्च वाचविण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे.

What's Your Reaction?






