ग्राम महसूल अधिकाऱ्याला मारहाण:हिंगोलीच्या भानखेडा शिवारातील घटना, दोघे अटकेत; वाहन खराब झाल्याने पोलिसांनी पायी फिरवले
सेनगाव तालुक्यातील भानखेडा शिवारात ग्राम महसूल अधिकाऱ्यास मारहाण करून सरकारी कामात अडथळा आणणाऱ्या दोघांना सेनगाव पोलिसांनी शुक्रवारी ता. १ सकाळी वाढोणा शिवारातून अटक केली. त्यांना हिंगोली येथे आणल्यानंतर पोलिसांचे वाहन खराब झाल्याने दोघांनाही पायीच शहरातून उपविभागीय अधिकारी कार्यालयात हजर करण्यात आले. मात्र या वरात प्रकरणाची चर्चा सुरु झाली आहे. सेनगाव तालुकयातील भानखेडा शिवारात उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकडे यांच्या पथकाने मध्यरात्रीच्या सुमारास एक टिप्पर पकडले होते. घुटुकडे यांनी टिप्परमध्ये ग्राम महसूल अधिकारी अजय चोरमारे यांना बसवून सदर टिप्पर सेनगाव पोलिस ठाण्यात आणण्याची सुचना केली. मात्र घुटुकडे हे जीप घेऊन पुढे गेल्यानंतर काही वेळातच दोन कारमधून आलेल्या सहा जणांनी चोरमारे यांना टिप्पर खाली ओढून मुक्कामार दिला. यामध्ये त्यांच्या पाठीला गंभीर दुखापत झाली. याप्रकरणी चोरमारे यांच्या तक्रारीवरून सेनगाव पोलिस ठाण्यात सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन सेनगावचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दीपक मस्के, जमादार पवन चाटसे, सुभाष जाधव यांच्या पथकाने आरोपींची शोध मोहिम हाती घेतली होती. यामध्ये शुभम खिल्लारे व नवनाथ राठोड हे दोेघे वाढोणा शिवारात असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तातडीने वाढोणा शिवारात जाऊन त्यांना अटक केली. त्यानंतर त्यांना हिंगोली येथे उपविभागीय अधिकारी कार्यालयात हजर करण्यासाठी आणत असतांना पोलिसांचे वाहन हिंगोली शहरात बंद पडले. त्यानंतर पोलिसांनी बसस्थानकापासून दोघांनाही पायीच सुमारे एक किलो मिटर अंतरावर असलेल्या उपविभागीय अधिकारी कार्यालयात पायी नेले. यावेळी बघ्यांची मात्र मोठी गर्दी झाली होती. दरम्यान या प्रकरणात उपविभागीय अधिकारी घुटुकडे यांच्या दालनात सुनावणी झाली. यामध्ये त्यांच्याकडून चांगल्या वर्तणुकीचे लेखी लिहून घेण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणात पोलिसांनी वाहन खराब झाल्यामुळे त्यांना हिंगोली शहरातून पायी नेल्याचे सांगितले तर या प्रकरणात त्यांची वरातच काढण्यात आल्याची चर्चा सुरु झाली होती.

What's Your Reaction?






