विष्णू विनायक स्वरमंदिरात 'मेघरंग' कार्यक्रमाचे आयोजन:गांधर्व महाविद्यालयातर्फे मल्हार रागाच्या विविध छटांचा गायन-वादनातून आविष्कार
भारतीय संगीत प्रसारक मंडळाच्या गांधर्व महाविद्यालयातर्फे वर्षा ऋतुनिमित्त आयोजित 'मेघरंग' कार्यक्रमात मल्हार रागाच्या विविध छटा गायन-वादनातून उमटल्या. विष्णू विनायक स्वरमंदिरात हा दोन दिवसीय कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाचे उद्घाटन ज्येष्ठ गायिका विदुषी मीरा पणशीकर, निवृत्त आयकर आयुक्त डॉ. राजीव रानडे, महाविद्यालयाचे प्राचार्य पंडित प्रमोद मराठे, उपप्राचार्या परिणिता मराठे, अपर्णा पणशीकर आणि पंडित सुरेश बापट यांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलनाने झाले. पहिल्या दिवशी ज्येष्ठ गायिका आशा खाडिलकर तर दुसऱ्या दिवशी सीजीएसटीच्या अतिरिक्त आयुक्त वैशाली पतंगे आणि एसआरपीएफ कमांडंट तेजस्वी सातपुते यांची विशेष उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात अपर्णा पणशीकर यांच्या गायनाने झाली. त्यांनी गौड मल्हार रागातील 'काहे हो' हा बडा ख्याल तिलवाडा तालात सादर केला. त्यानंतर स्वरचित बंदिश, 'बलमा बहार आयी' ही रचना आणि द्रुत तालातील 'जर झरन झरन' व 'अब रसिला' या मल्हार रागातील रचना सादर केल्या. ग्वाल्हेर-आग्रा घराण्याचे गायक पंडित सुरेश बापट यांनी जयत कल्याण रागातील 'पपीहा न बोल' या पारंपरिक बंदिशीने सुरुवात केली. त्यानंतर मास्टर कृष्णराव यांची 'बरसन बरसन लागी चहू' ही रचना सादर केली. मियाँ मल्हार मधील 'आयो है मेह नही' आणि 'कहे लाडली' या रचनांसह सूर मल्हारमधील 'गढ दे बीर' आणि प्रल्हाद गानू यांची 'आए बदरा कारी कारी' या रचना रसिकांना ऐकवल्या. दुसऱ्या दिवशी रोहित मराठे यांच्या संवादिनी वादनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यांनी मियाँ मल्हार रागातील सुनंद तालातील रचना, द्रुत एकतालातील रचना आणि राग मेघमधील द्रुत तीनताल सादर केला. गौड मल्हार रागातील झपतालातील रचनेने त्यांनी संवादिनी वादनाची सांगता केली. सुप्रसिद्ध सरोद वादक अनुपम जोशी यांनी मैहर घराण्याचे वैशिष्ट्य असलेल्या अप्रचलित देस मल्हार रागातील आलाप, विलंबित गत, द्रुत गत आणि झाला यांची सुंदर मांडणी केली. सरोदवर महाराष्ट्रातील अभंगमाला वाजविणारे जगातील एकमेव वादक म्हणून ओळखले जाणारे अनुपम जोशी यांनी 'कानडाऊ विठ्ठलु', 'अबीर गुलाल उधळीत रंग', 'खेळ मांडियेला', 'कानडा राजा पंढरीचा' या अभंगांची झलक ऐकवली. रसिकांनी त्यांच्या कलेला भरभरून दाद दिली.

What's Your Reaction?






