तरुणीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीविरुद्ध कारवाई:हडपसर पोलिसांनी 24 तासांत न्यायालयात दाखल केले आरोपपत्र
पुणे येथील हडपसर पोलिसांनी कामावर जाणाऱ्या तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी अटक केलेल्या आरोपीविरुद्ध अवघ्या २४ तासात आरोपपत्र दाखल केले आहे. सुमीत पांडुरंग चाबुकस्वार (वय ३६, रा. मुंढवा, पुणे) असे आरोपीचे नाव आहे. पीडित तरुणीने हडपसर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, आरोपी सुमित तिला त्याच्याबरोबर राहण्यासाठी सातत्याने आग्रह करत होता. तरुणी कामावरून ये-जा करत असताना तो तिचा पाठलाग करायचा. तसेच तिला अडवून तिच्याशी असभ्य वर्तन करत होता. तरुणीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी त्वरीत गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा तपास सहायक पोलिस निरीक्षक हसीना शिकलगार यांच्याकडे सोपवण्यात आला. पोलिसांनी भारतीय न्याय संहितेतील कलम १८३ अन्वये तरुणीचा जबाब नोंदवला. साक्षीदारांचे जबाब घेतले आणि आरोपीने गुन्हा करण्यासाठी वापरलेली दुचाकी जप्त केली. गुन्ह्याच्या तपासात ई-साक्ष प्रणालीद्वारे पुरावे संकलित करण्यात आले. पुरावे आणि जबाबांसह पोलिसांनी लष्कर न्यायालयात आरोपी चाबुकस्वारविरुद्ध आरोपपत्र दाखल केले. ही कारवाई परिमंडळ पाचचे पोलिस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे, सहायक आयुक्त अनुराधा उदमले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय मोगले, गुन्हे शाखेचे निरीक्षक निलेश जगदाळे, अश्विनी जगताप, सहायक निरीक्षक हसीना शिकलगार आणि विनोद शिर्के यांनी केली. दरम्यान, कोंढवा पोलिसांनी विवाहाच्या आमिषाने तरुणीवर बलात्कार केल्याप्रकरणी एका आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तक्रारदार तरुणी आणि आरोपी तरुणाची ओळख झाली होती. विवाहाचे आमिष दाखवून त्याने तरुणीला फसवले आणि तिच्यावर वेळोवेळी बलात्कार केला. विवाहाबाबत विचारणा केल्यानंतर आरोपीने नकार दिल्याने तरुणीने पोलिसांत तक्रार दिली आहे.

What's Your Reaction?






