पुण्यात पोलिसांना भरचौकात मारहाण:दुचाकी वेडीवाकडी चालवल्याने जाब विचारणाऱ्या दोन पोलिसांवर चौघांचा हल्ला; आरोपींना अटक
पुणे येथील मुंबई-पुणे रस्त्यावरील खडकी मधील चर्च चौकात दुचाकी वेडीवाकडी चालवल्याने जाब विचारणाऱ्या पोलिसांना भरचौकात टोळक्याने बेदम मारहाण केली. या घटनेत पोलीस कर्मचाऱ्यांचा गणवेश फाटला असून खडकी पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये जुनैद इक्बाल शेख (२७), नफीज नौशाद शेख (२५), युनुस युसुफ शेख (२५) आणि आरिफ अक्रम शेख (२५) यांचा समावेश आहे. खंडणी विरोधी पथकातील पोलीस कर्मचारी गोपाल गोठवाल (२८) यांनी खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकातील पोलीस कर्मचारी गोठवाल आणि काजळे हे मुंबई-पुणे महामार्गावर गस्त घालत होते. त्यावेळी दोन आरोपी दुचाकीवरून भरधाव वेगाने निघाले होते. पोलिसांनी त्यांना दुचाकी वेडीवाकडी का चालवतात अशी विचारणा केली. आरोपींनी पोलिसांना शिवीगाळ करून "विचारणा करणारा तू कोण?" असे म्हटले. पोलिसांनी त्यांना दुचाकी बाजूला घेण्यास सांगितले असता दोघांनी पोलिसांना मारहाण सुरू केली. त्यानंतर आणखी दोन आरोपी दुसऱ्या दुचाकीवरून तेथे आले आणि त्यांनीही पोलिसांना मारहाण केली. मारहाणीत गोठवाल रस्त्यावर पडले आणि चारही आरोपींनी त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या हल्ल्यात त्यांचा गणवेश फाटला. काजळे यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता आरोपींनी त्यांनाही धक्काबुक्की केली. काजळे यांनी त्वरित पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती कळवली. गस्त घालणारे पोलिसांचे पथक तेथे पोहोचले आणि चारही आरोपींना ताब्यात घेण्यात आले. मारहाणीत पोलीस कर्मचारी गोठवाल यांच्या डोक्याला आणि छातीला दुखापत झाली आहे. सरकारी कामात अडथळा आणणे आणि मारहाण केल्याप्रकरणी चौघांना अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. पोलीस उपनिरीक्षक दिग्विजय चौगले या प्रकरणाचा तपास करत आहेत.

What's Your Reaction?






