बोरसर ग्रामपंचायतीकडून आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांची कानउघाडणी:बैठकीत आरोग्य अधिकारी, कर्मचाऱ्यांना समज
बोरसर आरोग्य केंद्रातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांच्या मनमानी कारभारावर ग्रामपंचायतीने कारवाई केली. शुक्रवारी सकाळी १० वाजता ग्रामपंचायतीने आरोग्य केंद्रात बैठक घेतली. सरपंच मायाताई होले, उपसरपंच प्रकाश पवार, माजी सरपंच अरविंद शेवाळे, माजी उपसरपंच अण्णासाहेब पवार, सदस्य अण्णा पठारे आणि ग्रामस्थ उपस्थित होते. गेल्या काही महिन्यांपासून आरोग्य केंद्रातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून रुग्णसेवेत अनागोंदी सुरू होती. याबाबत ग्रामपंचायतीकडे तक्रारी आल्या होत्या. २० जून २०२५ रोजी ‘दिव्य मराठी’त वृत्त प्रसिद्ध झाले होते. याची दखल घेत ग्रामपंचायतीने आरोग्य कर्मचाऱ्यांना फैलावर घेतले. सरपंच मायाताई होले यांनी कर्मचाऱ्यांना समज दिली. रुग्णांशी समन्वय ठेवून वेळेवर सेवा द्यावी, असे सांगितले. अधिकारी आणि कर्मचारी दररोज वेळेवर उपस्थित राहावेत. बाळंतपणासाठी आलेल्या महिलांची गैरसोय होऊ नये. बाळंतपण आरोग्य केंद्रातच करावे. रुग्णांना औषधे वेळेवर द्यावीत. मुख्य आरोग्य अधिकाऱ्यांनी सात उपकेंद्रे आणि ३६ गावांना वेळोवेळी भेटी द्याव्यात. साथीच्या रोगांवर उपाययोजना कराव्यात. गावातील विहिरी आणि हातपंपांचे पाणी तपासणीसाठी पाठवावे. कुटुंब नियोजनाचे कॅम्प घ्यावेत. या सूचना कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या. आदेशांचे पालन न केल्यास वरिष्ठांकडे तक्रार केली जाईल, असेही सांगण्यात आले. मुख्यालयी दररोज हजर राहण्याबाबत केल्या सूचना ^ आम्ही बोरसर आरोग्य केंद्रात बैठक घेतली. यावेळी आरोग्य केंद्राचे मुख्य आरोग्य अधिकाऱ्यांसह सर्वांना मुख्यालयी दररोज हजर राहून रुग्णांना सेवा देण्याचे सांगून यापुढे आरोग्य विषयक कुठलीही तक्रार सहन केल्या जाणार नाही. कामात हलगर्जीपणा केल्यास वरिष्ठांकडे तक्रार करण्यात येईल, असे सूचित केले. -मायाताई होले, सरपंच अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आरोग्यविषयक सेवा द्यावी ^ बैठकीत मुख्य आरोग्य अधिकारी व सह आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांना आरोग्य विषयक योग्य त्या सूचना दिल्या. आरोग्य केंद्रात येणाऱ्या रुग्णासोबत चांगले वर्तन, त्यांची सेवा व आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या सात उप आरोग्य केंद्र व ३६ गावांमध्ये साथीचे आजारी उद््भवू नये, यासाठी फवारणी, आरोग्य सप्ताह व गावांना भेटी देणे आदींविषयी समज दिली. -अरविंद शेवाळे, माजी सरपंच

What's Your Reaction?






