कोल्हापूरच्या 'माधुरी'साठी मंत्रालयात बैठक:हत्ती परत आणण्यासाठी प्रयत्न करणार - CM; हत्ती मारण्यासाठी वनतारामध्ये नेला - राजू शेट्टी
कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी मठाची 'महादेवी' हत्तीण पुनर्वसनाच्या नावाखाली दुसऱ्या राज्यात नेल्याने सुरू असलेल्या वादामुळे राजकीय वातावरण तापले आहे. या प्रकरणी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक झाली. यामध्ये काँग्रेसचे विधान परिषद सदस्य सतेज पाटील आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी भाग घेऊन आक्रमक भूमिका मांडली, ज्यामुळे सरकारची कोंडी झाली आहे. माध्यमांशी बोलताना राजू शेट्टी यांनी अत्यंत संतप्त प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलण्यासाठी आलो. तो कायदा काय सांगतो, कोर्ट काय म्हणतंय याच्याशी आम्हाला काही देणं-घेणं नाही. आमचे हत्ती मारण्यासाठी वनतारामध्ये घेऊन जात आहात का? असा थेट सवाल त्यांनी सरकारला विचारला. शेट्टी यांनी प्रशासनावर कोर्टाची दिशाभूल केल्याचा आरोप केला. ते म्हणाले की, "पशुसंवर्धन विभागाच्या ९ वेगवेगळ्या टेस्टमध्ये माधुरी हत्तीण पास झाली असताना, तिला 'अनफिट' ठरवून 'वनतारा'चा रिपोर्ट सांगतो की तिला 'मल्टिपल फ्रॅक्चर' आहे, 'संधिवात' आहे. मग महाराष्ट्राचे अधिकारी खोटे आहेत, की 'हत्ती पाहिजे' म्हणून हत्ती घेऊन जाणारे खोटे आहेत, हे स्पष्ट झाले पाहिजे." त्यांनी 'वनतारामधील' इतर हत्तींचे व्हिडिओ का येत नाहीत, असा प्रश्नही त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारला आहे. "आता आम्हाला कायद्याचा कुट काढण्यामध्ये अजिबात रस नाही. आम्हाला आमचा हत्ती परत पाहिजे. यावर शासन काय करणार या प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनभावना आम्ही महाराष्ट्र शासनाच्या वतीने मांडू. हत्तिणीला परत आणण्यासाठी प्रयत्न करणार असे मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याचे राजू शेट्टी म्हणाले. वनताराकडून प्राण्यांचा छळ राजू शेट्टी म्हणाले की, वनतारा आणि पेटाकडून प्राण्याचा छळ सुरू आहे. हत्तीणीची नगा राखण्यासाठी डॉक्टरांचे पथक तयार करणार आहे. शासन तुमच्या बाजूने राहील असे मुख्यमंत्र्यांनी आम्हाला सांगितले आहे. 'हत्ती मठात परत यावा'- सतेज पाटील याचवेळी काँग्रेस नेते सतेज पाटील यांनीही आपली भूमिका मांडली. "गेल्या महिनाभरापासून आम्ही ताकदीने जनभावना सरकारपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. जनप्रक्षोभ झाल्यानंतर सरकारने आजची बैठक बोलावली," असे पाटील म्हणाले. ते म्हणाले, "आमची अपेक्षा आजच्या बैठकीतून एकच आहे की हत्ती मठात परत यावा. त्यासाठी सरकार काय पाउले उचलणार हे ऐकण्यासाठी आम्ही आलो आहोत. आम्ही आमची भूमिका मांडली आहे." पाटील आणि शेट्टी यांनी घेतलेल्या या भूमिकेमुळे सरकारवर हत्तिणीला पुन्हा महाराष्ट्रात आणण्याचा दबाव वाढला आहे.

What's Your Reaction?






