कोल्हापूर नंतर आता पुण्यात मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाची मागणी:खासदार सुप्रिया सुळे यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र
पुणे शहर आणि परिसरातील लोकसंख्या आणि प्रलंबित खटल्यांची संख्या पाहता पुणे खंडपीठाची गरज असल्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. त्यासाठी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र देखील पाठवले आहे. या पत्रात त्यांनी या खंडपीठाची आवश्यकता का आहे? या बाबत कारणांसह माहिती दिली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील लाखो नागरिकांच्या जलद व सुलभ न्यायाच्या मूलभूत हक्काच्या दृष्टीने, पुणे येथे मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ स्थापन करणे ही काळाची गरज असल्याचे खासदार सुप्रिया सुळे यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. सद्यःस्थितीत, पुणे जिल्ह्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या इंदापूर तालुक्यातील नीरा नरसिंहपूर येथून मुंबई उच्च न्यायालयापर्यंतचे अंतर सुमारे 350 किलोमीटर आहे. हे अंतर पार करताना सामान्य नागरिक, वकील, विधिज्ञ आणि साक्षीदार यांना अत्यंत वेळखाऊ, खर्चिक व मानसिक त्रासदायक अनुभवांना सामोरे जावे लागते. ही परिस्थिती "Justice delayed is justice denied" या तत्त्वाला बाधा आणणारी असल्याचेही सुळे यांनी म्हटले आहे. या संदर्भात सुळे यांनी केलेली पोस्ट देखील पहा.... यामध्ये त्यांनी म्हटले की, 'शासनाने नुकतेच कोल्हापूर येथे मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ स्थापन करण्यास मंजुरी दिली आहे. या निर्णयाचे आम्ही सर्वजण स्वागत करतो. परंतु आता याच धर्तीवर आता पुण्यात देखील खंडपीठ स्थापन करण्याची गरज आहे. पुणे शहर आणि परिसरातील लोकसंख्या आणि प्रलंबित खटल्यांची संख्या पाहता पुणे खंडपीठाची गरज लक्षात येईल. पुणे शिक्षण, प्रशिक्षण व प्रशासनाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे शहर आहे. याखेरीज येथील बार असोसिएशनने सातत्याने ही मागणी शासनाकडे लावून धरली आहे. माझी मुख्यमंत्री महोदयांना नम्र विनंती आहे की कृपया याची आपण नोंद घेऊन मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ पुणे येथे करण्यास मंजुरी द्यावी.'

What's Your Reaction?






