सामान्यांचे हक्क हिरावण्याचे प्रयत्न:वंचित बहुजन युवा आघाडीचे पाताेडेंचे प्रतिपादन; युवा संसदेचे आयोजन
आगामी जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय पक्षांकडून जोरदार हालचाली सुरू असून, तेल्हारा येथील शासकीय विश्राम भवन येथे वंचित बहुजन युवा आघाडीकडून युवा संवाद बैठक पार पडली. देशात ज्याप्रमाणे संविधानाशी खेळून सर्वसामान्यांचे हक्क हिरावण्याचे प्रयत्न होत असून, त्याला युवकच उत्तर देऊ शकतात. त्यामुळे युवकांनी समोर यावे, असे आवाहन आघाडीचे प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे यांनी याप्रसंगी केले. वंचित बहुजन युवा आघाडी तेल्हारा तालुक्यातील विविध शाखांचे उद्घाटन झाले. तेल्हारा तालुक्यात जि. प. सर्कल नुसार बांधणी झालेली असून गाव तिथे शाखा अभियानाला प्रारंभ झाला. घोडेगाव, पाथर्डी, टाकळी, भांबेरी, खेल देशपांडे येथे नाम फलकाचे अनावरण वंचित बहुजन युवा आघाडीचे प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे यांच्या हस्ते करण्यात आले. आजपर्यंत केलेल्या सर्व क्रांत्या या युवकांनी केल्याचे युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत घोगरे म्हणाले. कार्यक्रमाला जिल्हा महासचिव राजकुमार दामोदर, जिल्हा उपाध्यक्ष नितीन वानखडे, सचिन शिराळे, नकुल काटे, जय तायडे, तालुकाध्यक्ष झिया शाह, महासचिव राजेश दारोकार, संघटक अनंत इंगळे, पंचायत समिती माजी सभापती आम्रपाली गवई, माजी जि. प. सदस्य सैफुल्ला खान, प्रदीप तेलगोटे, अन्वर खान जाफर खान यांच्यासह तालुक्यातील पदाधिकारी-कार्यकर्ते उपस्थित होते.

What's Your Reaction?






