अभद्र युतीकडून हिंदुस्थानला बदनाम करण्याचे काम सुरू:हिंदू राष्ट्र समन्वय समितीचे घनवट यांची काँग्रेस- राकाँवर टीका
सध्या देशात एक ‘अभद्र युती’ सक्रिय असून, ही युती हिंदुस्थानला बदनाम करण्याचे काम करत आहे. अर्बन नक्षलवाद्यांसहित स्वतःला धर्मनिरपेक्ष म्हणवणारे, तसेच अन्य पंथीयांतली हिंदुधर्मद्वेष्टे हे या अभद्र युतीचे घटक आहेत. देशात हिंदू विरोधी घटकांची अभद्र युतीचा बीमोड करण्याची आवश्यकता, असे मत हिंदू राष्ट्र समन्वय समितीचे राष्ट्रीय संघटक सुनील घनवट यांनी व्यक्त केले. ते हिंदुराष्ट्र समन्वय समितीच्या वतीने आयोजित सभेत बोलत होते. सुनील घनवट यांनी "राष्ट्र-धर्माची सध्यस्थिती व हिंदुराष्ट्र स्थापनेसाठी संघटित कार्याची आवश्यकता' या विषयावर मार्गदर्शन केले. हिंदू धर्माची प्रतिमा मलिन करणे आणि शिक्षण संस्थांमधून हिंदूविरोधी विचारांची पेरणी करून युवकांची दिशाभूल करणे, लव्ह जिहाद, धर्मांतराला प्रोत्साहन देणे अशा कारवाया सातत्याने सुरू आहेत. यासाठी त्यांची इको सिस्टम कार्यरत आहे. हे एक व्यापक षड््यंत्र आहे. ते ओळखून या प्रवृत्तींचा बीमोड करण्यासाठी आपणही आपली इको सिस्टम तयार करून संघटितपणे विरोध केला पाहिजे; अन्यथा हिंदूंचे भविष्य धोक्यात आहे, असेही ते म्हणाले. साध्वी प्रज्ञा सिंग, शंकराचार्य जयेंद्र सरस्वतींसारखे संत, हिंदुत्वनिष्ठ यांच्यावर अन्याय करणाऱ्या व्यवस्थेवरही घनवट यांनी सडकून टीका केली. कार्यक्रमाला जिल्ह्यातील विविध हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, धर्मप्रेमी नागरिक, अधिवक्ते असे २०० पेक्षा जास्त जण उपस्थित असल्याचे आयोजकांचे म्हणणे आहे. सूत्रसंचालन हिंदू जनजागृती समितीच्या अश्विनी सरोदे यांनी केले. जिल्ह्यातील आढावा सादर : कार्यक्रमात हिंदू राष्ट्र समन्वय समितीच्या जिल्ह्याचे संयोजक उदय महा यांनी समितीच्या जिल्ह्यातील कार्याचा आढावा सादर केला. समितीच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात विविध धार्मिक, सामाजिक आणि जनजागृतीपर उपक्रम यशस्वीपणे राबवण्यात आले. पश्चिम बंगालमधील हिंदूंवरील अत्याचारांच्या विरोधात दीडशेहून अधिक धर्माभिमानी नागरिकांनी एकत्र येत प्रभावी आंदोलन केले याचाही उल्लेख आढावा सादर करताना करण्यात आला. इतर धर्मीय समुदाय जेव्हा संघटितपणे त्यांच्या हितासाठी उभे राहतात. हिंदू मात्र एकमेकातच विभागलेले दिसतात. हे चित्र पुसले गेले पाहिजे व सर्व संघटनांनी एकजूट होऊन हिंदु विरोधी कारवायांना हाणून पाडणे आवश्यक आहे. यातच सर्वांचे हित आहे असे आवाहन हिंदू जनजागृती समितीचे श्रीकांत पिसोळकर यांनी केले. सभेत पिसोळकर यांनी हिंदू समाजाच्या संघटनेच्या अभावावर भाष्य केले. काँग्रेस- राकाँ समाचार पृथ्वीराज चव्हाण, जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या हिंदू धर्मविरोधी वक्तव्याचा घनवट यांनी समाचार घेतला. अशा वक्त्यांविरोधात उभे राहण्याचे आवाहन करत धर्म, देश व संस्कृतीच्या रक्षणासाठी ही वेळ निर्णायक आहे, असेही ते म्हणाले.

What's Your Reaction?






