दादरमधील कबुतर खाना पूर्णपणे बंद:कबुतरांचा मृत्यू होत असल्याने धार्मिक संघटना आक्रमक; मंत्री मंगल प्रभात लोढांचा पुढाकार, लवकरच बैठक
मुंबई महानगरपालिकेच्या वतीने नुकताच दादरमधील कबुतर खाना पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. मात्र महानगरपालिकेच्या या कारवाईमुळे मुंबईतील जैन समाज आक्रमक झाला आहे. या ठिकाणी खायला मिळत नसल्याने कबुतरांचा मृत्यू होत असल्याचे जैन समाजाने म्हटले आहे. त्यामुळे आता जैन समाजाने आक्रमक भूमिका घेतली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी मुंबईतील कबुतर खाने तडकाफडकी बंद करू नये, अशी भूमिका घेतली आहे. या संदर्भात प्रसार माध्यमांशी बोलताना मंत्री लोढा यांनी कबुतरांचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न केला. कबुतर हे नॉनव्हेज खात नाही तसेच ते पडलेले अन्न खात नाही. हे कबुतरांचे वैशिष्ट्य असल्याचे लोढा यांनी म्हटले आहे. त्यामुळे त्यांना मरू देणार नाही, ही आमची जबाबदारी आहे. मात्र त्याचबरोबर लोकांचे आरोग्य देखील महत्त्वाचे आहे. यामध्ये कोणाचेही दुमत असल्याचे कारण नाही, असे देखील लोढा यांनी म्हटले आहे. नॅशनल पार्क, आरे कॉलनी अशा भागांमध्ये या पक्षांसाठी विशेष जागा राखून ठेवून त्या ठिकाणी काहीतरी सुरू झाले पाहिजे. ज्या परिसरात लोकवस्ती कमी आहे, अशा परिसरात कबुतरांची पर्यायी व्यवस्था करायला हवी, असे देखील ते म्हणाले. यासाठी नॅशनल पार्क, आरे कॉलनी, रेस कोर्स, बीकेसी, कोस्टल रोड वरील गार्डन्स अशा ठिकाणी कबुतरांची पर्याय व्यवस्था करायला हवी, अशी मागणी लोढा यांनी केली आहे. राज्य सरकार काय भूमिका घेणार? याकडे सर्वांचे लक्ष या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर महानगरपालिकेने कबुतर खाना बंद केला असला तरी यामुळे कबुतरांचा मृत्यू झाला असल्याचा दावा केला जात आहे. अशा पद्धतीने अचानक कबुतर खाना बंद करण्यास धार्मिक संघटनांनी देखील विरोध केला आहे. वाद वाढत असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात महत्त्वाची बैठक बोलणार असल्याचे सांगितले आहे. उच्च न्यायालयाच्या वतीने दिलेल्या निर्णयानुसार राज्य सरकार काय भूमिका घेणार? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

What's Your Reaction?






