हिंगोलीत मॉक ड्रीलसाठी वापरलेल्या रेल्वेच्या दोन डब्यांना आग:अग्नीशमनदलाने अडीच तासात मिळवले आगीवर नियंत्रण, अज्ञात व्यक्तीने आग लावल्याची शंका
हिंगोलीत मॉकड्रीलसाठी वापरलेल्या रेल्वेच्या दोन डब्यांना बुधवारी ता. ६ सकाळी आग लागल्याची घटना घडली आहे. रेल्वे पोलिस व पालिकेच्या अग्नीशमन दलाच्या पथकाने अडीच तासात अगीवर नियंत्रण मिळविले आहे. यामध्ये कोणतीही जिवीत वा वित्त हानी झाली नसल्याचे रेल्वे पोलिसांच्या सुत्रांनी सांगितले. हिंगोली येथील रेल्वेस्थानकाव आपत्ती व्यवस्थापनांतर्गत ता. २१ एप्रील रोजी मॉकड्रील घेण्यात आले होते. यावेळी रेल्वेच्या चार डब्ब्यांना आग लागल्यानंतर रेल्वेचे आपत्ती व्यवस्थापन पथक, पालिकेचे पथक किती वेळात पोहोचते याचा आढावा घेण्यात आला. तसेच पथक घटनास्थळी पोहोचल्यानंतर डब्ब्यात अडकलेल्या प्रवाशांना कसे बाहेर काढायचे, आगीवर नियंत्रण कसे मिळवायचे याची माहिती देण्यात आली होती. या मॉकड्रीलमध्ये खराब झालेले रेल्वेचे डब्बे रिसालाबाजार रेल्वेपुलाच्या बाजूला रेल्वे रुळावर उभे करून ठेवण्यात आले होते. दरम्यान, आज सकाळी साडे आठ वाजण्याच्या सुमारास त्यापैकी एका डब्यातून धुर निघत असल्याचे रेल्वे पोलिस कर्मचारी प्रभाकर इंगोले यांच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने घटनास्थळी पाहणी केली असता आग लागल्याचे दिसून आले. त्यांनी तातडीने या घटनेची माहिती स्टेशन मास्तर तसेच हिंगोली पालिकेला दिली. पालिका मुख्याधिकारी अरविंद मुंडे, स्वच्छता निरीक्षक बाळू बांगर यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. अग्नीशमनदलाचे पथक व रेल्वे पोलिस विभागाचे सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक चंद्रकांत खंदारे, जमादार प्रभाकर इंगोले, अंकुश बांगर, विश्वांभर शिंदे, मोतीराम काळे यांनी आगीवर नियंत्रण मिळविले. तब्बल अडीच तासानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. यामध्ये दोन डब्यांमधील मॉकड्रील नंतर शिल्लक राहिलेले साहित्य जळाले. सुदैवाने यामध्ये कुठलीही जिवीत व वित्त हानी झाली नसल्याचे रेल्वे पोलिसांच्या सुत्रांनी सांगितले. या घटनेत अज्ञात व्यक्तीने आग लावल्याची शक्यता असून त्यानुसार रेल्वे पोलिसांचे पूर्णा येथील कार्यालयात गुन्हा दाखल होणार असल्याचे रेल्वे पोलिसांनी सांगितले.

What's Your Reaction?






