सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ देणार आखाड्यांना विसर्जनाचे साहित्य:पदाधिकाऱ्यांमध्ये अनेक मुद्द्यांवर झाली चर्चा, प्रशासनास निवेदन
शहरातील गणेश मंडळांचे गेल्या १३२ वर्षांपासून संचालन व व्यवस्थापन करणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची व मिरवणुकीत सहभागी असणारे आखाड्याचे संचालक, कार्यकर्त्यांची नियोजन सभा नुकतीच झाली. या नियोजन बैठकीत शहरातील बहुसंख्य आखाड्यांचे संचालक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. श्रींच्या मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या आखाडे व तालीम मंडळांना लेझीम, लाठ्या, भवरा आदी कवायतीचे साहित्य पुरवण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष अॅड. मोतीसिह मोहता यांच्या अध्यक्षतेत झालेल्या बैठकीत आगामी २७ ऑगस्ट ते ६ सप्टेंबरपर्यंत आयोजित गणेशोत्सवावर चर्चा करण्यात आली. यावर्षी ११ दिवसाचे गणपती राहणार आहेत. गणेशोत्सवासाठी यंदाही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे संपूर्ण पदाधिकारी व कार्यकारिणी नेहमीप्रमाणे शहरातील सर्व लहान मोठ्या गणेशोत्सव मंडळाच्या सेवेत व सहकार्यासाठी तत्पर राहणार आहेत. सर्व गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला सहकार्य करावे असे आवाहन अॅड. मोहता यांनी यावेळी केले. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे महासचिव सिद्धार्थ शर्मा यांनी प्रास्ताविक केले. या चर्चेत मिरवणूक लवकर कशी निघेल यावर चर्चा करण्यात येऊन सर्व आखाड्यांना प्रमुख चौकात कवायतीसाठी वीस मिनिटे देण्याचे सर्वानुमते ठरवण्यात आले. तसेच सर्व आखाड्यांचे प्रशिक्षण शिबिर, मेळावा आखाड्यातील समन्वय वाढवण्यासाठी घेण्याचे निश्चित करण्यात आले. शहरातील सर्व आखाड्यांनी आपली वेळ मर्यादा पाळावी, त्याचप्रमाणे गणेश मंडळांनीही मिरवणुकीत वेळ मर्यादा पाळून मंडळ व प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले. दरम्यान सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी मंडळाचे अध्यक्ष अॅड. मोतिसिंह मोहता यांच्या पुढाकारात जिल्हाधिकारी अजित कुंभार, पोलिस अधीक्षक अर्चित चांडक यांना मंडळाच्या विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. यावेळी कार्याध्यक्ष हरीश अलीमचंदानी, संग्राम गावंडे, महासचिव सिद्धार्थ शर्मा, अॅड. सुभाषसिंग ठाकूर, विजय जयपिल्ले, विजय तिवारी, उपाध्यक्ष मनोज खंडेलवाल, मनोहर पंजवाणी, केशवराव पातोंड, सचिव संतोष पांडे, नीरज शहा, मनोज शाहू, मंगेश काळे, सहसचिव जयंत सरदेशपांडे समवेत बहुसंख्य पदाधिकारी कार्यकर्ते व आखाडा संचालक उपस्थित होते. यामध्ये शहरातील विशेष करून मिरवणुकीचे मार्ग व अकोट मोटर स्टँड ते अग्रसेन चौक या रस्त्याची दुरुस्ती, मिरवणुकीतील मार्गावर दिवाबत्ती व विद्युत व्यवस्था, मंगलदास मार्केट ते माणिक टॉकीजपर्यंत विद्युत व्यवस्था, मिरवणुकीतील रस्त्यावरील अतिक्रमण हटवण्यात यावे, मोठ्या वाहनासाठी अकोट मोटर स्टँड ते दगडी पूल हा मार्ग प्रतिबंधित आहे तरीही या रस्त्यावर सर्रास मोठे वाहन सुरू असतात ते प्रतिबंधित करण्यात यावा, रस्त्यावरील केबलचे वायर व्यवस्थित करण्यात यावेत, लहान व मोठ्या पुलावरील रेलिंग दुरुस्त करण्यात यावी, मिरवणुकीच्या मार्गावर महिला व पुरूषांकरता अस्थायी प्रसाधन गृह, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात यावी, गणेशोत्सवातील अंतिम चार दिवसात भाविकांची गर्दी लक्षात घेता उपहारगृहांची वेळ मर्यादा वाढवून द्यावी, खुल्या रस्त्यावरील होणारी मांस विक्री बंद करण्यात यावी आदी मागण्या या निवेदनात करण्यात आल्यात.

What's Your Reaction?






