कोपरगावात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून स्वच्छता मोहीम
कोपरगाव शहरातील प्रमुख रस्ते, चौक आणि इतर सार्वजनिक ठिकाणी ही मोहीम राबवण्यात आली. प्लास्टिक कचऱ्याची विल्हेवाट, पान टपऱ्यांजवळील घाण, सार्वजनिक ठिकाणावरील कचरा काढणे अशा विविध स्वरूपाची स्वच्छतेची कामे राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी केली. निमित्त होते आमदार आशुतोष काळे यांच्या वाढदिवसाचे. या मोहिमेत पक्षाचे शहराध्यक्ष, आजी माजी नगरसेवक व पदाधिकारी तसेच मतदार संघातील असंख्य कार्यकर्त्यांनी स्वच्छता मोहीमेत स्वयंस्फूर्तीने सहभाग घेतला होता. स्वच्छता मोहीम राबविण्याबाबत कार्यकर्त्यांनी सांगितले की, आ.आशुतोष काळे यांची समाजहिताची दृष्टी आम्हा सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. स्वच्छता मोहीम राबवण्यामागे कार्यकर्त्यांचा उद्देश केवळ साफसफाई करणे नव्हता, तर त्यामागे एक व्यापक सामाजिक संदेश देण्याची भूमिका होती. आ. काळे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जागरूकता निर्माण व्हावी, सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ आणि आरोग्यदायी राहावीत, तसेच युवा पिढीनेही समाजोपयोगी कामात पुढाकार घ्यावा, हा या मोहिमेचा मुख्य उद्देश होता. या मोहिमेतून ‘स्वच्छता ही सेवा आहे’ हा संदेश शहरभर पोहोचवण्यात आला, आणि एक जबाबदार नागरिक म्हणून प्रत्येकाने आपापल्या भागात स्वच्छता राखावी, ही भावना जागृत करण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे ही मोहीम म्हणजे नि:स्वार्थ सेवा, जबाबदारीची भावना आणि समाजाप्रती असलेली बांधिलकी यांचा सुरेख संगम होता.

What's Your Reaction?






