सुखरूप असल्याचे आईने सांगताच सोडला सुटकेचा नि:श्वास:शहरातील कल्पना बनसोड यांच्याशी संपर्क झाल्याने मुलगा, माळीवाड्यातील कुटुंबीयांचा जीव पडला भांड्यात
उत्तराखंड येथील काशी, गंगोत्री येथे देवदर्शनासाठी अहिल्यानगरसह संभाजीनगरहून १८ जण भाविक गेले होते. त्यात अहिल्यानगर शहरातील माळीवाडा येथील कल्पना बनसोड यांचा देखील समावेश होता. ४ ऑगस्टला त्यांचे उत्तर काशीचे दर्शन झाले, ५ ऑगस्टला दुपारी १२ वाजता त्या गंगोत्री येथे पोहचल्या, मात्र पुढच्या अडीच तासांत गंगोत्री येथे दरड कोसळली आणि त्यानंतर दुपारी ३ पर्यंत त्यांच्याशी संपर्क न झाल्याने त्यांचे कुटूंब काळजीत होते. त्यानंतर बुधवारी दुपारी ४ वाजता लष्करी कॅम्पमध्ये हॉटस्पाट घेऊन आम्ही सुखरुप असल्याचा मेसेज आला आणि आम्ही सुटकेचा नि:श्वास सोडला, असे अजिंक्य बनसोड यांनी "दिव्य मराठी'शी बोलताना सांगितले. अहिल्यानगरच्या कल्पना बनसोड या १ ऑगस्टला मुंबईहून उत्तराखंड येथे यात्रेसाठी गेल्या होत्या. त्यांच्यासमवेत छत्रपती संभाजीनगर येथील १७ भाविक देखील होते. सोमवारी त्याचे उत्तर काशीचे दर्शन झाले होेते. मंगळवारी दुपारी १२ वाजता त्या गुप्रबरोबर गंगोत्री येथे पोहचल्या होत्या. तेथे बॅगा ठेवल्या आणि त्या दर्शनासाठी बाहेर पडणार होत्या, मात्र दुपारी अडीच वाजता अचानक ढगफुटी झाली, त्या ठिकाणी दरडी कोसळल्या, त्यामुळे त्यांना तेथे थांबावे लागले. त्यानंतर सर्वांचे फोन बंद झाले होते. संपर्क होत नसल्याने काळजी वाढली होती. बुधवारी दुपारी ४ वाजता गंगोत्री येथे लष्कराच्या वनक्षेत्र विभागात हॉटस्पाट घेऊन आम्ही सुखरुप असल्याचा मेसेज आला. सासरे संतोष कुपटकर यांनी मेसेजबरोबरच फोन करुन आईसह आम्ही सर्वजण सुखरुप असल्याचे सांगितले.त्यामुळे आमची काळजी कमी झाली, असे अजिंक्य बनसोड यांनी सांगितले. दरम्यान उत्तराखंड, काशीत पर्यटक अडकले असतील तर जिल्हा आपत्ती विभागातील टोल फ्री क्रमांक १०७७ व ०२४१-२३२३८४४, २३५६९४० क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. गंगोत्रीत वीज नाही, मोबाईल सेवा ठप्प दरड कोसळल्यानंतर गंगोत्री परिसरात वीज पुरवठा बंद झाला आहे. शिवाय मोबाईल सेवा देखील बंद झाल्यामुळे संपर्क होत नाही.आम्हाला आता लष्कराच्या परिसरात ठेवण्यात आले आहे. मोबाईल सेवा सुरु झाल्यानंतर पुन्हा मेसेज करु, असे कुपटकर यांनी सांगितले आहे, असे बनसोड यांनी सांगितले.

What's Your Reaction?






