ऊसाचे थकीत पेमेंट मिळण्यासाठी "स्वाभिमानी'ची निदर्शने व धरणे
केदारेश्वर साखर कारखान्याकडे असलेले शेतकऱ्यांचे थकीत ऊसाचे पेमेंट तत्काळ देण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने तहसील कार्यालयावर निदर्शने व धरणे आंदोलन करण्यात आले. केदारेश्वर साखर कारखान्याने २०२४- २५ या गळीत हंगामासाठी शेतकऱ्यांकडून ऊस घेतला त्या ऊसाची साखर, मळी, भुसा, यांची विक्री होऊन सहा महिने उलटले. तरीही शेतकऱ्यांना ऊसाचे पेमेंट मिळालेले नाही. आज शेतकरी आर्थिक संकटात आहे, बँक,सेवा संस्थाचे घेतलेले पीक कर्ज भरणा व इतर आर्थिक गरजा भागवता येत नाहीत. थकीत पेमेंट एकरकमी व्याजासह तत्काळ द्यावेत, संपूर्ण गळीत हंगामाचा हिशोब तोडणी, वाहतूक, उतारा, साखर निर्मिती व विक्रीचा अहवाल सादर करून ऊस उत्पादकांचे पेमेंट व कारखान्याच्या कर्मचाऱ्यांचे थकीत पगार तसेच १० टक्के पगारवाढ साखर आयुक्त, कारखान्याचे सभासद व शेतकरी संघटनांच्या उपस्थितीत करावी. शेतकऱ्यांचा कारखाना असताना कारखान्याचे व्यवस्थापन अपयशी ठरले आहे. याची जबाबदारी संचालक मंडळावर निश्चित करावी आदी मागण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनच्या वतीने शेवगाव तहसील कार्यालय येथे निदर्शने व धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात आंदोलनात जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रय फुंदे, रावसाहेब लवांडे, बाळासाहेब फटांगडे, माऊली मुळे, चंद्रकांत झारगड मेजर अशोक भोसले, मच्छिंद्र आरले, अमोल देवडे, नाना कातकडे, अंबादास भागवत,मच्छिंद्र डाके, अभिमन्यू दास आदी सहभागी झाले. तहसीलदार आकाश दहाडदे यांनी आंदोलकांची भेट घेऊन २० ऑगस्टपर्यंत पेमेंट देण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी शेतकऱ्यांनी तीव्र संताप भावना व्यक्त करून कारखान्याच्या प्रशासनावर प्रश्नांची सरबत्ती केली.

What's Your Reaction?






