डोंगर चढत तहसीलदारांची डोंगरवाडीस भेट
तालुक्यातील अतिदुर्गम आणि डोंगराळ भागात वसलेल्या डोंगरवाडी या गावात पहिल्यांदाच तहसीलदार अभिजित बारवकर स्वतः पायी चालत पोहोचले. तीन किलोमीटरचा डोंगर पार करत त्यांनी ग्रामस्थांची भेट घेतली. यामुळे गावात अभूतपूर्व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. गावात प्रत्यक्ष शासकीय अधिकारी आल्याने नागरिकांनी आनंद व्यक्त करत फुलांनी व टाळ्यांनी त्यांचे स्वागत केले. अनेक ज्येष्ठ नागरिकांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले. तहसीलदार बारवकर यांनी संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे लाभार्थी, विशेषतः वृद्ध व दिव्यांग व्यक्तींना गावातच डीबीटी स्वरुपात अनुदानाची प्रक्रिया पूर्ण करून दिली. याशिवाय, इतर विविध शासकीय योजनांची माहिती दिली. या दौऱ्यादरम्यान नायब तहसीलदार अनिल भंडारे, तलाठी वर्षा देशमुख यांच्यासह अनेक अधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते. या भेटीमुळे दुर्गम भागातील नागरिकांना प्रशासन आता जवळचे वाटू लागले आहे.

What's Your Reaction?






