सेनगाव आरोग्य कार्यालय वानरांच्या ताब्यात, कर्मचारी गायब!:गैरहजर कर्मचाऱ्यांना नोटीस, वेतन कपात होणार, तालुका आरोग्य अधिकाऱ्यांचा निर्णय
हिंगोली जिल्ह्यात एकीकडे आरोग्य विभागाचे बळकटीकरण करण्याचे प्रयत्न केले जात असतांना दुसरीकडे वरिष्ठ अधिकारी बैठकीला गेल्याची संधी साधत कर्मचारी बाहेर निघून गेल्याने वानरांनीच कार्यालयाचा ताबा घेतल्याचे चित्र सोशल मिडीया वर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओ वरून स्पष्ट होत आहे. या प्रकाराची चांगलीच चर्चा जिल्ह्यात रंगू लागली आहे. हिंगोली जिल्ह्यातील आरोग्य संस्थांचे बळकटीकरण करून ग्रामीण भागातील रुग्णांना तातडीची आरोग्य सेवा मिळाली पाहिजे यासाठी प्रशासकिय पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अंजली रमेश यांनी वेळोवेळी ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रांना भेटी देऊन त्या ठिकाणच्या कामकाजाची माहिती घेण्यास सुरवात केली आहे. ग्रामीण भागातील रुग्णांना तातडीची आरोग्य सेवा मिळाली पाहिजे अशा स्पष्ट सूचना दिल्या जात आहेत. मात्र बहुतांश ठिकाणी या सूचनांची पालन केले जात नसल्याचे चित्र आहे. दरम्यान, सेनगाव येथील तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयात शुक्रवारी ता. 1 अधिकारी बैठकीला गेल्याचा गैरफायदा घेत कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी दुपारीच कार्यालय सोडले. त्यानंतर या कार्यालयाचा ताबा चक्क वानरांनीच घेतला. कार्यालयातील प्रत्येक खोलीतून वानरे मुक्तपणे फिरत होती. तर वानरांनी काही खुर्च्याही पाडून टाकल्या होत्या. कार्यालयात एकही कर्मचारी नसल्याने वानरांचा सुमारे एक ते दिड तास मुक्त धुमाकुळ सुरु होता. या कार्यालयात कामासाठी आलेल्या एका नागरिकाने वानराच्या उच्छादाचा तसेच कार्यालयात एकही कर्मचारी नसल्याचा व्हिडीओ तयार करून सोशल मिडीया वर प्रसारीत केला. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. तर वेतन कपातीची कारवाई करणार- रुणवाल सेनगाव तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सतीश रुणवाल म्हणाले की, हिंगोली येथील जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी ता. 1 बैठकीसाठी गेलो होतो. जे कर्मचारी कार्यालयात गैरहजर होते त्यांना कारणे दाखवा नोटीस देऊन खुलासा मागणार आहे. ज्यांचे खुलासे असमाधानकारक असतील त्यांच्यावर वेतन कपातीची कारवाई केली जाईल.

What's Your Reaction?






