राजस्थानच्या वैद्यकीय विद्यार्थिनीची पुण्यात आत्महत्या:बी.जे. वैद्यकीय महाविद्यालयातील 23 वर्षीय तरुणीने वसतिगृहात गळफास घेतला
पुणे शहरातील नामांकित बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयातील द्वितीय वर्षात शिक्षण घेणाऱ्या 23 वर्षीय तरुणीने मंगळवारी रात्री वसतिगृहातील एका रिकाम्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आलेली आहे. ज्योती कृष्णकुमार मीना (वय 23, रा. राजस्थान) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. ज्योती मीना ही मूळची राजस्थान येथील रहिवासी असून ती बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयात द्वितीय वर्षात शिक्षण घेत होती. ती कॉलेजच्या वसतिगृहात राहत होती. मंगळवारी रात्री हॉस्टेल मधील तिच्या खोली समोरील एका मोकळ्या खोलीत तिने गळफास घेतला असल्याचे उघडकीस आले आहे. ही बाब लक्षात येताच सहकाऱ्यांनी आणि अधिवास कर्मचाऱ्यांनी तातडीने याची माहिती बंड गार्डन पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच बंड गार्डन पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. आत्महत्येपूर्वी लिहिलेली एक चिठ्ठी सापडली असून, त्यातून ती नैराश्यात होती, हे प्राथमिक तपासातून समोर आले आहे. मात्र ,आत्महत्येचे नेमके कारण काय, हे स्पष्ट होणे बाकी आहे. बंड गार्डन पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. याबाबत बंड गार्डन पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रवींद्र गायकवाड म्हणाले,मयत तरुणी बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयात द्वितीय वर्षात शिक्षण घेत आहे. मंगळवारी संध्याकाळी साडेसहा वाजता ती रूम मधून बाहेर पडली होती. सध्या वैद्यकीय महाविद्यालयात परीक्षा सुरू असल्याने ती अभ्यास करण्यासाठी हॉस्टेल मध्ये दुसरीकडे गेली असल्याचा संशय तिचा रूम मधील दुसऱ्या मैत्रिणीला होता. परंतु रात्री उशीर होऊनही ती रूम मध्ये परत आली नसल्याने तिचा शोध सुरू झाला. हॉस्टेल मधील वॉर्डन यांनी याबाबत पोलिसांकडे रात्री साडेअकरा वाजता तक्रार दिली. तिचा शोध घेताना, बुधवारी रात्री एक वाजता तिच्या रूम समोरील दुसऱ्या रूम मध्ये तिचा गळफास घेतलेला मृतदेह मिळून आला आहे. याबाबत अधिक तपास करण्यात येत आहे.

What's Your Reaction?






