पर्यावरणप्रेमींतर्फे वटवृक्षाशी नाते जपणारा मैत्री दिन:शहरात ‘जीवन’ वृक्षाच्या पुनर्रोपणाचा नववा वाढदिवस, तरुणाईची मोठ्या संख्येने होती उपस्थिती
प्रतिनिधी | अकोला फॅन्सी गिफ्ट्स, रंगीबेरंगी बॅंड्स, मित्रांना शुभेच्छा, केक – हे सगळं मैत्री दिनाचं चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं. मात्र अकोल्यातील काही पर्यावरणप्रेमींनी याही पुढे जाऊन ‘मैत्री दिन’ साजरा करताना एक आगळावेगळा उपक्रम राबवला. मैत्री ही केवळ माणसांपुरती मर्यादित न ठेवता निसर्गाशीही जपता येते, हे दाखवत त्यांनी एका वटवृक्षाच्या पुनर्रोपणाच्या दिवशी वाढदिवस साजरा करून मैत्रीचा उत्सव साजरा केला. हे वृक्ष ‘जीवन’ या नावाने ओळखले जाते. २०१७ मध्ये आदर्श कॉलनी परिसरात रस्त्यावर गांधी रोड परिसरात उन्मळून पडलेल्या या वटवृक्षाचे पुनर्रोपण केले होते. विशेष म्हणजे ही फक्त एक वेळची कारवाई न राहता, या वृक्षाशी नातं टिकवण्यासाठी दरवर्षी त्याचा वाढदिवस म्हणजेच ‘वृक्ष पुनर्रोपण दिन’ साजरा केला जातो. ‘मैत्री दिना’ला वटवृक्षाचे पुनर्रोपण केल्यामुळे दरवर्षी मैत्री दिनाला वाढदिवस साजरा करून निसर्ग मित्रता वाढीस लागावी, यासाठी आवाहन करण्यात येते. ३ ऑगस्टला वाढदिवस उत्साहात झाला. कार्यक्रमात वृक्षपूजन, वृक्षाला मैत्रीचा धागा बांधणे, केक कापणे आणि वृक्षाशी भावनिक नातं दृढ करण्याचा संकल्प घेण्यात आला. "जीवन" या वटवृक्षाला मैत्रीचा प्रतीक मानत त्याच्या संगोपनासाठी निसर्गप्रेमींनी सामूहिक जबाबदारी स्वीकारली. निसर्गप्रेमी यांच्या पुढाकारात आतापर्यंत अकोला शहर व परिसरात ४२ वृक्षांचे पुनररूपण करण्यात आले आहे. उपस्थितांनी वृक्षाशी संवाद साधत ‘वृक्षमित्र’ या नात्याला अधोरेखित केलं. या उपक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून आमदार अमोल मिटकरी यांनी सहभाग घेत वृक्षपूजन केले. या वेळी ते म्हणाले, ‘निसर्गाशी नातं जोडणं म्हणजे मानवी संस्कृतीचं खरे मूलभूत शिक्षण. वृक्ष म्हणजे जीवनाचा श्वास आहे. अशा उपक्रमांमधून पर्यावरणाविषयीची संवेदना अधिक बळकट होते.” या वेळी उपस्थित पर्यावरणप्रेमी अजय गावंडे यांनी सांगितले की, ‘जीवन’ हा वटवृक्ष आता आमच्या आयुष्याचा एक घटक बनला आहे. दरवर्षी त्याचा वाढदिवस म्हणजे आमच्यासाठी निसर्गाशी मैत्री करण्याचा खास क्षण असतो.’ कार्यक्रमाचे आयोजन शंभूराजे प्रतिष्ठानने केले होते. या वेळी वृक्षांचे संगोपन, पर्यावरण संवर्धन, जलसंवर्धन याबाबत जनजागृती करणारी माहितीही देण्यात आली. उपस्थित विद्यार्थ्यांमध्ये वृक्षमैत्रीचे संदेशवहन होण्यासाठी पत्रके आणि चित्रफलकही लावले होते. कार्यक्रमाला तुळशिदास खिरोडकार, संजय मालोकार, उमेश अलोणे, मयूर जोशी, स्वप्नील थोरात, डॉ. जीवन किरडे, डॉ. प्रवीण लोखंडे, राहूल इंगोले, सोनू गुडदे, धनंजय साबळे,अक्षय गवळी, किशोर राठोड, रजनी गावंडे, दिनकर गायकवाड़, मुकेश मेर, संजय भांगे, ओम पागृत, महेश गावंडे, सचिन पाटील, बाळा पाटील, गौतम इंगळे, नीलेश बोचरे यांच्यासह विद्यार्थी व अनेक वृक्षमित्र उपस्थित होते.

What's Your Reaction?






