हळदा येथे क्रांतीसूर्य महाराणा प्रताप यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे लोकार्पण:कार्यक्रमाची सुरुवात गावातून काढण्यात आलेल्या भव्य मिरवणुकीने
प्रतिनिधी | उंडणगाव हळदा (ता. सिल्लोड) स्वराज्य, स्वाभिमान आणि शौर्याचे प्रतिक असलेल्या क्रांतीसूर्य महाराणा प्रताप यांच्या अश्वारूढ भव्य पुतळ्याचे अनावरण हळदा येथे अतिशय जल्लोषात आणि उत्साहात पार पडले. या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होण्यासाठी हजारो ग्रामस्थ, पाहुणे व विविध क्षेत्रातील मान्यवर एकत्र आले होते. कार्यक्रमाची सुरुवात गावातून काढण्यात आलेल्या भव्य मिरवणुकीने झाली. या मिरवणुकीमध्ये लेझीम पथक, तुळशी कळस, वारकरी दिंडी, बँड पथक, तसेच सजवलेल्या बग्गीतून महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेने उपस्थितांचे लक्ष वेधले. ग्रामसेवक, तलाठी, पोलिस अधिकारी, महिला व पुरुष मंडळी, शाळेतील विद्यार्थी यांचा अबाल वृद्ध गावकरी उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला. कार्यक्रमाचे उद्घाटक आणि अध्यक्ष म्हणून एपीआय ढाकरे उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून भगवान गायकवाड (सहायक पोलिस निरीक्षक) यांनी उपस्थिती नोंदवली. कार्यक्रमाचे पाहुणे म्हणून बारवले (प्रदेशाध्यक्ष, करणी सेना), संध्याताई राजपूत (प्रदेशाध्यक्ष, महिला करणी सेना), सुलताने, विकास कोतवाल, गोकुळसिंग मरपट, जयपाल ठाकूर, श्रीराम भगुरे, सुनील मिरकर, अशोक सूर्यवंशी, गणेश टाकसाळ, ग्रामसेवक अनिकेत वाघ, तलाठी, तसेच महाराणा प्रताप समितीचे सदस्य व समस्त हळदा ग्रामस्थ यांनी कार्यक्रमास बहुमान दिला. पुतळ्याचे अनावरण आणि वातावरणात देशभक्तीचा जागर : मिरवणुकीनंतर महाराणा प्रताप यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण लोकार्पण दिमाखात आणि धार्मिक विधीनंतर करण्यात आले. यावेळी गावातील वातावरण "राजपूत शौर्याच्या जयघोषांनी’, ढोल-ताशांच्या गजरात, राष्ट्रभक्तीच्या गगनभेदी घोषणांनी भारले गेले होते. उपस्थितांची उर्जा, गावकऱ्यांचा उत्साह आणि सामाजिक एकोप्याचे दर्शन यावेळी घडले. एक प्रेरणादायी दिवस हा कार्यक्रम गावाच्या सामाजिक ऐक्याचे, संस्कृतीच्या अभिमानाचे आणि वीर महाराणा प्रतापांच्या शौर्याची प्रेरणा घेण्याचे उत्तम उदाहरण ठरला. ग्रामपंचायत हळदा डकला आणि महाराणा प्रताप उत्सव समितीने हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अपार मेहनत घेतली. हळदा गावाने इतिहासाची स्मृती जिवंत ठेवली आणि भविष्यासाठी प्रेरणा निर्माण केली. "क्रांतीसूर्य महाराणा प्रताप’ यांच्या तेजस्वी आठवणी आता या गावात सदैव अजरामर राहतील हे मात्र नक्की.

What's Your Reaction?






