हडपसरमध्ये कोयताधारी टोळीचा धुडगूस:हप्ता मागत सहा ते सात वाहनांची आणि दुकानांची तोडफोड, नागरिकांमध्ये भीती
पुणे शहरात सातत्याने वाहन तोडफोडीच्या घटना होत असतानाच हडपसर येथील साडेसतरानळी परिसरात कोयताधारी सहा ते सात जणांच्या टोळक्याने हप्ता द्या म्हणत वाहनांची व दुकानाची तोडफोड करत धुडगुस घातला. यावेळी टोळक्याने हत्यारे हातात मिरवून दहशत पसरवत नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण केले. हडपसर येथील साडेसतरा नळी परिसरात २०३ छत्रपती शिवाजी महाराज चौक आहे. रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास टोळके हातात हत्यारे धेऊन परिसरात दाखल झाले. यावेळी कोयताधारी टोळक्याने पाणीपुरीच्या गाड्या, दुचाकी, चार चाकी वाहने, रिक्षांची अशा पाच ते सहा वाहनांची तसेच स्वीटमार्ट दुकानाची तोडफोड केली. वर्दळीच्या वेळी टोळक्याने धुडगुस घातल्यामुळे परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले. तोडफोडीच्या घटनेच्यावेळी नागरिकांनी आपली दुकाने तात्काळ बंद केली. यावेळी टोळक्याने हातात हत्यारे घेऊन परिसरात दहशत माजवली. सामान्य नागरिकांच्या गाड्या फोडून नुकसान करणार्या टोळक्याचा पोलिसांनी तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. या तोडफोडीच्या घटनेनंतर हडपसर पोलिस घटनास्थळी दाखल झाली. त्यांनी लागलीच आरोपींचा शोध घेण्यासाठी पथक कामी लावले आहे. शहरात वारंवार तोडफोडीच्या घटना घडत असताना व सामान्य नागरिकांना वेठीस धरणार्या अशा टोळक्यांचा कायमचा बंदोबस्त कधी होणार असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे. हप्ता पाहीजे म्हणून घोषणाबाजी यावेळी नागरिकांनी सांगितले टोळक्याकडे कोयत्यासारखी हत्यारे होती. त्यांनी दुकांनाची तोडफोड तर केलीच पण येथे नागरिकांना धमकावले. यावेळी दुचाकीवर हत्यारे घेऊन आलेल्या टोळक्याने हप्ता द्या म्हणून तोडफोड केली. तसेच पोलिसांनी आरोपींना अटक करून त्यांची धिंड काढावी अशीही मागणी नागरिकांनी यावेळी केली. कोयताधारी टोळीचा वेळीच बंदोबस्त न केल्यास स्थानिक लोक प्रतिनिधींनी आंदोलनाचा इशारा यावेळी दिला आहे.

What's Your Reaction?






