एकनाथ शिंदे पुन्हा राजधानी दिल्लीत:अमित शहांना भेटले, मोदींना भेटणार; उद्धव ठाकरेही 3 दिवस दिल्लीत तळ ठोकून, घडामोडींना वेग
सत्ताधारी शिवसेनेचे सर्वेसर्वा तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दिल्लीच्या दौऱ्यावर आहेत. ते गत आठवड्यातच दिल्ली दौऱ्यावर गेले होते. त्यानंतर लगेचच त्यांनी पुन्हा दिल्ली गाठली आहे. विशेषतः शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेही आजपासून 3 दिवस दिल्ली दौऱ्यावर असताना शिंदे अचानक दिल्ली दौऱ्यावर गेल्यामुळे याविषयी राज्याच्या राजकारणात वेगवेगळ्या अटकळी व्यक्त केल्या जात आहेत. एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत पोहोचल्यानंतर सर्वप्रथम केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. तिथे त्यांच्याशी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसह वेगवेगळ्या मुद्यांवर चर्चा केली. शहांच्या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, सध्या संसदेचे अधिवेशन सुरू आहे. त्यामुळे मी सर्व खासदारांसोबत गृहमंत्री अमित शहा यांची सदिच्छा भेट घेतली. त्यांच्यापुढे खासदारांचे काही विषय मांडले. मागच्या आठवड्यातही मी येथे आलो होतो. तेव्हा शहांची भेट झाली नव्हती. आज ते भेटले. केंद्रीय गृहमंत्री म्हणून अमित शहा यांनी सर्वाधिक काळ काम केले. याविषयी मी त्यांचे अभिनंदन केले. आम्ही लोकसभा व विधानसभा निवडणूक महायुती म्हणून लढलो. आता स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूकही आम्ही महायुती म्हणूनच लढवू. अमित शहा याविषयी सकारात्मक आहेत. त्यामुळे आजची बैठक खऱ्या अर्थाने सकारात्मक बैठक झाली, असे शहा म्हणाले. मंत्री उदय सामंत यांचे कानावर हात दुसरीकडे, मंत्री उदय सामंत यांनी एकनाथ शिंदे आपल्या दौऱ्यात कोणकोणत्या नेत्यांची भेट घेणार याची आपल्याला कोणतीही कल्पना नसल्याचे स्पष्ट केले आहे. ते म्हणाले, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत आहेत ही वस्तुस्थिती आहे. पण ते कुणाला भेटणार याची मला काहीही कल्पना नाही. दुसरी गोष्ट म्हणजे जी मंडळी शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्यावर टीका करतात, ती मंडळीही आज दिल्लीतच आहेत. ते आज राहुल गांधी यांच्यासोबत स्नेहभोजन करणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे त्यांनी शिंदेंवर टीका करताना आत्मचिंतन व आत्मपरिक्षण केले पाहिजे. ठाकरे गट काँग्रसेच्या तालावर काँग्रेसच्या आदेशावर चालतो. त्यामुळे त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करण्याची गरज नाही. ठाकरे गट काँग्रेसच्या ध्येयधोरणावर आधारित असून, तो पक्ष राहुल गांधीच चालवतात असे मी म्हणालो तर चालेल का? त्यामुळे त्यांनी दुसऱ्या पक्षावर टीका करताना विचार केला पाहिजे, असे सामंत म्हणाले. शिवसेना ही सत्ताधारी एनडीएमध्ये आहे. त्यामुळे पंतप्रधानांकडून निधी आणणे ही आमची जबाबदारी आहे. पण सत्तेत नसताना काँग्रेसच्या तालावर नाचणे कितपत योग्य आहे? असा खोचक टोलाही सामंत यांनी यावेळी उद्धव ठाकरे यांना हाणला. उद्धव ठाकरेंचा तीन दिवस दिल्लीत तळ दुसरीकडे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे आजपासून 3 दिवस दिल्ली दौऱ्यावर आहेत. ते खासदार संजय राऊत यांच्या निवासस्थानी पोहोचल्यानंतर सायंकाळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार असल्याची माहिती आहे. याशिवाय ते आपल्या पक्षाच्या खासदारांशीही संवाद साधणार आहेत. उद्या 7 ऑगस्ट रोजी उद्धव ठाकरे हे राहुल गांधींनी आयोजित केलेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीला हजर राहणार आहेत. या दिल्ली दौऱ्यात आमदार आदित्य ठाकरे हे देखील उद्धव ठाकरेंसोबत आहेत.

What's Your Reaction?






