राजस्थानी मंडळाचा अमृतमहोत्सव:भगवद्गीतेमुळे खुला होतो आनंददायी आणि चैतन्यमय जीवनाचा राजमार्ग, गीता विशारद डॉ.संजय मालपाणी यांचे प्रतिपादन
श्रीमद्भगवद्गीता हा समुपदेशन या विषयावरील जगातील सर्वश्रेष्ठ ग्रंथ आहे. त्यामुळे तब्बल सव्वापाच हजार वर्षे लोटली तरीही गीता नवीनच वाटते. प्रत्येकवेळी गीतेतून वेगवेगळा अर्थबोध होतो आणि नकारात्मकता व नैराश्यावर मात करुन आनंददायी आणि चैतन्यमय जीवनाचा राजमार्ग खुला होतो, असे प्रतिपादन गीता विशारद डॉ.संजय मालपाणी यांनी केले. राजस्थान युवक मंडळाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित त्रिदिन अध्यात्मिक व्याख्यानमालेच्या दुसऱ्या दिवसाचे पुष्प गुंफताना ‘विषादाकडून विवेकाकडे’ अर्थात ‘ज्ञानेश्वरी भावयात्रा’ या विषयावर ते विवेचन करीत होते. यावेळी मंचावर प्रल्हाद शिंदे, मंडळाचे अध्यक्ष मनीष मालपाणी, कार्याध्यक्ष सुमीत अट्टल, उपाध्यक्ष सागर मणियार, सचिव कल्पेश मर्दा आदी उपस्थित होते. डॉ.मालपाणी यांनी श्रीमद्भगवद्गीतेच्या पहिल्या अध्यायाला अनुसरुन जीवनातील गीतेचे अढळस्थान अधोरेखीत केले. संस्कृत पंडित, प्रज्ञाभारती श्रीधर भास्कर वेर्णेकर यांनी ज्ञानेश्वरीचे सोप्या मराठीमध्ये रुपांतर केलेल्या ‘सुबोध भावार्थ दिपिका’ या ग्रंथातील अनेक ओव्यांचा मतिथार्तही त्यांनी उलगडून सांगितला. ज्ञानेश्वरी म्हणजे अत्तराची कूपी असून त्याच्या चिंतनाने आपले संपूर्ण जीवन सुगंधित होते असा स्वानुभाव कथन करताना त्यातून त्यांनी ‘जे आपणांस ठावे, ते इतरांना सांगावे’ याची प्रेरणा मिळाल्याचे सांगितले. श्रीमद् भगवद्गीता असा ग्रंथ आहे जो प्रत्यक्ष रणांगणावर सांगितला गेला आहे. या ग्रंथाची जगभरात जयंतीही साजरी केली जाते. गीता विजयाचे शास्त्र आहे. हा ग्रंथ म्हातारपणी नव्हेतर तरुण वयातच वाचला पाहिजे असा आग्रह धरताना त्यांनी या ग्रंथातून मानवी जीवनाचे अंतरंग उलगडतात, असेही सांगितले. गीतेमध्ये तरुणांसाठी प्रयत्नवादाचा मंत्र आहे, माणसाच्या मनातील प्रश्नांना गीता थेट उत्तर देते. त्याचे वाचन करताना आपण साक्षात भगवंताशी संवाद साधत असल्याचा अलौकीक आभास होतो, तो प्रत्येकाने अनुभवला पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.राजस्थान मंडळाचे सहसचिव कृष्णा आसावा यांनी वक्त्यांचा परिचय करुन दिला. उपाध्यक्ष सागर मणियार यांनी सूत्रसंचालन केले. भगवद्गीतेत नकारात्मकता, नैराश्यावर मात करणारा मंत्र जगभरात नैराश्यग्रस्तांची संख्या वाढत असून त्यांच्यावरील वैद्यकीय उपचारांची यादीही भली मोठी आहे, भगवद्गीतेत नकारात्मकता, नैराश्य, भय, भीती, संकोच, अहंकार या सर्वांवर मात करणारा मंत्र आहे. म्हणूनच ज्ञानेश्वरी आणि श्रीमद् भगवद्गीता हे ग्रंथ देवघरात ठेवण्यासाठी नाहीत. त्यांच्या नित्य वाचनातून मानवी जीवन सुखमय होवू शकते, मानवी जीवनाचे तत्त्वज्ञान असलेले हे ग्रंथ मानवाला प्रकाशाची वाट दाखवणारे आहेत, असेही डॉ. मालपाणी यांनी यावेळी सांगितले.

What's Your Reaction?






