शेअर मार्केटच्या नावाखाली गंडा घालणारा आरोपी जेरबंद
येथे इन्फिनिटी ट्रेडींग मल्टीर्व्हिसेस या नावाने शेअर मार्केट ट्रेडिंग कंपनी या नावाने शिवनगर, शेवगाव व पुणे येथे कंपनीच्या नावाखाली ८० लाख ३० हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्या आदित्य कुंदा अंधारे वय-२५ रा. शिवनगर, शेवगाव यास शेवगाव पोलिसांनी पुण्यातून अटक केली. याप्रकरणी प्रशांत महादेव नलावडे वय ३६ वर्षे,रा. विद्यानगर शेवगाव यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. आरोपी अंधारे हा यापुर्वीच शेवगाव शहर सोडुन फरार झाल्याची माहिती समजल्याने भौतिक व तांत्रिक बाबींची पडताळणी केली असता या गुन्ह्यातील आरोपी हा पुणे येथे गेल्याचे समजले. पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी गुन्ह्यातील फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिस पथक तयार करुन पुणे जिल्ह्यात रवाना केले होते. या गुन्ह्यातील फरार आरोपी आदित्य कुंदा अंधारे हा नऱ्हेगाव. ता- हवेली, जिल्हा- पुणे येथे होता. त्याला पोलिस पथक आल्याची चाहुल लागताच तो पळून जात असताना त्याला महर्षी कर्वे फॅशन कॉलेज इन्स्टिट्यूट येथे पाठलाग करुन पोलिसांनीताब्यात घेतले. त्याच्या विरुध्द इतर कोणाचीही फसवणूक झाली असल्यास त्यांनी शेवगाव पोलिसांत संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे, हेड कॉन्स्टेबल किशोर काळे, कॉन्स्टेबल श्याम गुंजाळ, कॉन्स्टेबल भगवान सानप, कॉन्स्टेबल दादासाहेब खेडकर, कॉन्स्टेबल राहुल आठरे, नगर दक्षिण सायबर सेलचे कॉन्स्टेबल राहुल गुड्डु यांनी केली.

What's Your Reaction?






