आखाडे लुटणारी टोळी जेरबंद:२.५६ लाखांचा मुद्देमाल जप्त, दोन गुन्हे उघडकीस; वृद्धांना करत होते मारहाण
हिंगोली जिल्ह्यात शेतातील आखाड्यावर जाऊन वृध्दांना मारहाण करून लुटणाऱ्या चौघांच्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुरुवारी ता. ७ अटक केली असून त्यांच्याकडून एका दुचाकीसह २.५६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्यांनी औंढा नागनाथ पोलिस ठाण्यांतर्गत दोन गुन्हे उघडकीस आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली जिल्ह्यात मागील काही दिवसांमध्ये शेतातील आखाड्यावर जाऊन वृध्दांना मारहाण करून लुटणारी टोळी कार्यरत होती. या टोळीने औंढा नागनाथ शिवार व असोला शिवारात दोन ठिकाणी मारहाण करून दागिने पळविले होते. या प्रकरणी औंढा नागनाथ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या घटनेमुळे आखाड्यावर राहणाऱ्या वृध्द शेतकऱ्यांमधून भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेच्या तपासासाठी पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अप्पर पोलिस अधीक्षक कमलेश मीना यांनी स्थानिक गुन्हे शाखेची पथके कार्यरत केली होती. यामध्ये पोलिस निरीक्षक मोहन भोसले, उपनिरीक्षक माधव जिव्हारे, विक्रम विठुबोने, जमादार प्रेम चव्हाण, लिंबाजी वाहुळे, कोंडबा मगरे, विकी कुंदनानी, किशोर सावंत, आझम प्यारेवाले, विशाल खंडागळे यांच्यासह पोलिसांची दोन पथके आरोपींच्या शोधासाठी रवाना केली होती. या पथकाला मिळालेल्या माहितीनुसार, पथकाने उध्दव बोरकर, सचिन गिरी (रा. राहोली खुर्द), यश काळे, शेख खलील (रा. हिंगोली) यांना अटक केली. पोलिसांनी त्यांची अधिक चौकशी केली असता त्यांनी दोन्ही गुन्हयातील चोरी केलेले सोन्याचे व चांदीचे दागिने जप्त केले आहेत. या शिवाय गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा २.५६ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्यांच्याकडून जिल्हयातील आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असल्याचे पोलिसांनी सांगितले. तर मारहाण करुन लुटणारी टोळी जेरबंद झाल्यामुळे आखाड्यावरील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

What's Your Reaction?






