महिलेस घरात घुसून मारहाण, ब्लेडने वार अन् विनयभंग:तिघांवर बासंबा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल, आरोपींचा शोध सुरू
हिंगोली तालुक्यातील बासंबा पोलिस ठाण्यांतर्गत एका गावात महिलेस मारहाण करून विनयभंग केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी तिघांवर बासंबा पोलिस ठाण्यात शुक्रवारी ता. 1 गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बासंबा पोलिस ठाण्यांतर्गत एका गावामध्ये एक महिला दुपारी दोन ते अडीच वाजण्याच्या सुमारास घरात जेवण करीत बसली होती. यावेळी शेख हानीफ, शेख लतीफ व अन्य एक जण तेथे आले. त्यापैकी शेख हानीफ याने माझी पत्नी घरातून निघून गेली तुझा संसार कसा होऊ देऊ असे म्हणत तिला केसाला धरून घराच्या बाहेर काढले. त्यानंतर महिलेस मारहाण करून तिच्या हातावर व पायावर तसेच पाठीवर ब्लेडने वार केले अन तिचा विनयभंंग केला. या शिवाय दारुची बाटली महिलेच्या डोक्यात फोडली. महिलेला केले रुग्णालयात दाखल दरम्यान, अचानक झालेल्या या प्रकारामुळे सदर महिला घाबरून गेली. तिला प्रतिकार करण्याची संधीही मिळाली नाही. या मारहाणीत जखमी झालेल्या महिलेस तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी त्या महिलेने दिलेल्या तक्रारीवरून बासंबा पोलिसांनी शेख हानीफ, शेख लतीफ यांच्यासह एका महिलेवर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन बासंबा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक विकास आडे, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक डी. आर. पोले, जमादार शिवप्रसाद पोले, गजानन बेडगे यांचे पथक आरोपींच्या शोधासाठी रवाना केले आहे. जमादार बेडगे पुढील तपास करीत आहेत.

What's Your Reaction?






