आतापर्यंत अपेक्षित हाेता ३८१.१ तर प्रत्यक्षात पडला ३२५.१ मि.मी पाऊस:जिल्ह्यात जुलैत सरासरीपेक्षा ५४.९ मि.मी. कमी पाऊस; नागरिकांची धाकधूक वाढली
प्रतिनिधी |अकोला जिल्ह्यात जुलैत सरासरीच्या तुलनेने ५४.९ मि.मी. कमी पाऊस पडला आहे. जुलैत २२३.२ मि.मी. पाऊस अपेक्षित असताना १६८.३ मि.मी. पाऊस पडला. आतापर्यंत जून व जुलैत ३६०.१ मि.मी. पाऊस पडणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात ३२४.३ मि.मी. पाऊस पडला आहे. गतवर्षी तर जून व जुलैत ४५३. ९. मि.मी. पावसाची नोंद केली होती. मात्र यंदा पावसाच्या विश्रांतीमुळे अकोलेकरांची पिण्याच्या पाण्याच्या अनुषंगाने तर शेतकऱ्यांची पेरणीसाठी धाकधूक वाढली आहे. ४ ते ६ ऑगस्ट दरम्यान पाऊस पडण्याची अंदाज हवामान विभागाच्या नागपूर येथील प्रादेशिक कार्यालयाकडून व्यक्त करण्यात आलेला नाही. जिल्ह्यात यंदा जूनच्या प्रारंभी वरूणराजाने फारशी कृपा केली नाही. मृगनक्षत्रात पावसाने पाठ फिरवल्याने अनेकांची चिंता वाढली. मात्र जूनच्या अखेरीस मात्र दोन वेळा मुसळधार पाऊस झाला. परिणामी महिना संपला तेव्हा १५५.८ मि.मी. पावसाची नोंद झाली. हा पाऊस सरासरीच्या ११३.८ टक्के होता. गतवर्षी जून महिन्यात हेच प्रमाण १३९ मिमी (सरासरीच्या १०१.५ टक्के) होते. जुलैत पहिल्या आठवड्यात पाच दिवस पावसाची संततधार सुरु होती. २२ जुलैला ग्रामीण भागात अतिवृष्टी झाली होती. सर्वाधिक पावसाची नोंद बाळापूर मंडळात तर १७७ मि.मी तर पातूर तालुक्यात ४०.६ मि.मी. पाऊस पडल्याची नोंद केली होती. मात्र दमदार पाऊस झाला नाही. अकोलेकरांना श्रावणातील रिमझिम पाऊस सरींची प्रतिक्षा श्रावणच्या मासाला १० दिवस उटल्यानंतरही पावसाची संततधार सुरु नसल्याचे दिसून येत आहे. उलट कमाल तपमान वाढतच असल्याचे जाणवत आहे. शनिवारी ३३.६ अंश सेल्सिअस, शुक्रवारी -३२.७, गुरुवारी-३३.२, बुधवारी ३०.३ अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले. वाढल्या उकाड्यामुळे अकोलेकरांच्या नजरा दमदार पावसासाठी आकाशाकडे लागल्या आहेत.

What's Your Reaction?






