श्रमदान २ दिवस ; युवकांकडून ५ कि.मी.खड्डेमय रस्ता दुरुस्त:दोन दिवस परिश्रम घेत गावासाठी इतरांपुढे आदर्श, श्रमदानातून शासनाचे डोळे उघडणारी कामगिरी,
प्रतिनिधी । नांदगाव खंडेश्वर खेड पिंपरी ते पापड हा खड्ड्यांमुळे धोकादायक बनलेला तसेच जागोजागी उखडलेला ५ कि.मी. अंतराचा रस्ता गावातील युवकांनी पावसात भिजत श्रमदानातून दोन दिवसांत खड्ड्यांमध्ये मुरूम टाकून दुरुस्त केला. त्यामुळे हा धोकादायक रस्ता सुस्थितीत आला असून सायकलने शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. अन्यथा त्यांना सायकल चालवणेही खडतर झाले होते. खेड पिंपरी येथील युवकांनी श्रमदानातून शासनाचे डोळे उघडणारी कामगिरी केली असून इतर गावांपुढेही आदर्श ठेवला आहे. खेड पिंपरी ते देशाचे पहिले कृषी मंत्री डॉ.पंजाबराव देशमुख यांचे जन्मगाव पापडपर्यंतच्या ५ कि.मी. रस्त्याची खड्ड्यांनी अक्षरश: चाळणी झाली आहे. मागील अनेक वर्षांपासून रस्त्याच्या दुर्दशेकडे जिल्हा परिषोसह जनप्रतिनिधींचे दुर्लक्ष झाले आहे. सायकलने शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना या धोकादायक रस्त्यावरून जीवावर उदार होऊन जावे लागत आहे. तसेच आजारी नागरिकांना नेण्यास अडथळे निर्माण झाले आहेत.सरपंच मंगेश हंसराज कांबळे यांनी ग्रामपंचायतीच्या ठरावानुसार व पत्रव्यवहाराद्वारे गेल्या दोन वर्षांत जिल्हा परिषद अमरावती आणि आमदारांकडे दुरुस्तीची मागणी केली.मात्र केवळ आश्वासने मिळाली व प्रत्यक्षात कोणतीच कारवाई झाली नाही. मोफत ट्रॅक्टरची व्यवस्था गावातील नागरिक दिनेश महादेव गिरी यांनी केली. युवकांचा होणार १५ ऑगस्ट रोजी गौरव सोहळा या कार्यामुळे संपूर्ण ग्रामस्थ व विद्यार्थीवर्गाला मोठा दिलासा मिळाला असून युवकांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे. ग्रामपंचायतमार्फत १५ ऑगस्ट रोजी श्रमदानात सहभागी प्रत्येक व्यक्तीचा गौरव करण्यात येणार असल्याची माहिती सरपंच मंगेश कांबळे यांनी दिली. या श्रमदान मोहिमेत शुभम पा. बोदडे, ईश्वर विटकरे, आकाश भोंडे,रूपेश राऊत, विजय चौधरी,अंकुश जाधव,ट्रॅक्टर चालक नाना राऊत,राहुल जाधव,सरपंच मंगेश कांबळे आणि इतर युवकांनी उल्लेखनीय सहभाग घेतला. विद्यार्थ्यांची अडचण दूर झाली ^युवकांनी विद्यार्थ्यांना शाळेत जाता यावे म्हणून दिले योगदान खेडपिंपरी ते पापड या रस्त्याची खड्ड्यांमुळे चाळणी झाली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना सायकलने शाळेत जाता येत नाही. यासाठी युवकांनी पुढाकार घेत ५ कि.मी.रस्ता मुरूम टाकून तात्पुरता दुरुस्त केला. खड्ड्यांमध्ये व्यवस्थित मुरूम भरण्यात आला. शासन, जनप्रतिनिधी सध्या झोपेत आहेत. आमदारांना निवेदन दिल्यानंतरही त्यांनी या गहन समस्येकडे लक्ष दिले नाही. नाईलाजाने श्रमदानातून रस्त्याची तात्पुरती दुरुस्ती करावी लागली. हा रस्ता दुरुस्त झाला नाही तर आंदोलन करणार. मंगेश कांबळे, सरपंच, खंडपिंपरी.

What's Your Reaction?






