संजय राऊत यांचा NDAच्या बैठकीवरून भाजपसह मोदींवर निशाणा:हत्तीसाठी आंदोलन करणाऱ्या कोल्हापूरकरांनाही टोला- शेतकरी आत्महत्या दिसत नाही का?
इंडिया आघाडीची बैठक दिल्लीमध्ये होत आहे. या बैठकीची धास्ती घेतल्या मुळेच नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत एनडीए मधील घटक पक्षांची बैठक आयोजित केली असल्याचा दावा उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. नरेंद्र मोदी यांनी पीओके परत घेतला असता, तर इंडिया आघाडीने देखील त्यांचा सत्कार केला असता. मात्र, आता एनडीए त्यांचा सत्कार का करत आहे? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. नरेंद्र मोदी यांनी ऑपरेशन सिंदूर च्या माध्यमातून पाक व्याप्त काश्मीर परत मिळवला असता तर आम्ही देखील त्यांचा सत्कार केला असता. मात्र आमची त्यांचा सत्कार करण्याची संधी हुकली असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. मात्र, आता एनडीएतील घटक पक्ष त्यांचा सत्कार का करत आहेत? हे आम्हाला माहिती नाही, असे देखील राऊत यांनी म्हटले आहे. कोल्हापूरकरांना टोला- शेतकरी आत्महत्या दिसत नाही का? महाराष्ट्र शेतकरी आत्महत्या करत आहेत. बेरोजगार वाढली आहे. बेरोजगार तरुण आत्महत्या करत आहेत. मात्र त्यांच्यासाठी कोणी रस्त्यावर उतरले नाही. एका हत्ती साठी मात्र कोल्हापूरकर रस्त्यावर उतरले असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. ज्या कोल्हापूरकरांनी भाजपला मतदान केले, तोच समाज आज एक हत्ती साठी रस्त्यावर उतरला आहे. त्यांच्या लढ्याबद्दल मला काही म्हणायचे नाही. त्यांच्या लढ्याला पाठिंबा असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. ठाकरे एकत्र आले तर मनपावर सत्ता नक्की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे स्थानिक स्वराज्य संस्था एकत्र लढले तर, राज्यातील अनेक महानगर पालिकेवर आमची सत्ता नक्कीच येईल, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्याने आमच्या कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास नक्कीच वाढला असल्याचेही राऊत यांनी म्हटले आहे. राज ठाकरे महाविकास आघाडीचा भाग होतील का? यावर मात्र, त्यांनी पुढचा प्रश्न असल्याचे म्हटले आहे. राहुल गांधी यांच्या वक्तव्याचे समर्थन चीन संदर्भात प्रश्न निर्माण करणे, यामध्ये राष्ट्रभक्तीचा प्रश्न येतो कुठे? असा प्रश्न संजय राऊत यांनी उपस्थित केला. वास्तविक सर्वोच्च न्यायालयाने जे सांगितले त्याचा आदर करावाच लागतो. मात्र गलवान व्हॅलीमध्ये जे झाले ते आपल्या हद्दीमध्ये घुसखोरी करूनच झाले असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे. चीनने भारताची जमीन हडप केली आहे. त्यांची ॲक्टिव्हिटी आपल्या हद्दीत दिसून येत आहे. चीनने भारताची जमीन घेतली यावरुन राहुल गांधी प्रश्न विचारत असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. हा प्रश्न प्रत्येक भारतीयांच्या मनात असल्याचेही संजय राऊत यांनी म्हटले आहे. त्यामुळे राहुल गांधी काहीही चुकीचे बोलले, असे वाटत नसल्याचेही राऊत म्हणाले. तिबेट पासून अक्सायी चीन पर्यंतचे अतिक्रमण चीनने केलेले होते. या बाबत अटल बिहारी वाजपेयी पासून तर आतापर्यंत अनेकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. याआधी देखील विरोधी पक्षांनी पंडित नेहरूंना आरोपीच्या पिंजऱ्यात उभा केले होते. आताही तेच प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्यामुळे राहुल गांधी यांचे काही चुकतेय असे मला वाटत नाही. हा संपूर्ण देशाच्या मनातील प्रश्न असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. जम्मू-काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याची मागणी कलम 370 हटवायला सहा वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र, आता सहा वर्षात काश्मीरमध्ये काहीही बदललेले नाही. त्या ठिकाणी भारतीय घटना लागू झाली असली तरी भारतीय घटनेनुसार तेथे कोणतेही काम होत नाही. भारतीय नागरिक आजही काश्मीरमध्ये जमीन खरेदी करू शकलेला नाही. आजही कश्मीर मध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणुकीचे स्वप्न दाखवले गेले होते ते पूर्ण झालेले नाही. काश्मीरमधील तरुणांना रोजगार मिळालेला नाही. कश्मीर मधला हिंसाचार आणि दहशतवाद थांबलेला नाही, असे देखील राऊत यांनी म्हटले आहे. पहलगाम मधील एक मोठी घटना समोर आली मात्र अशा लहान घटना तिथे वारंवार घडत असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. तेथील सरकार लोकशाही मार्गाने निवडून आलेले असले तरी त्या सरकारला कोणतेही अधिकार नाही. जम्मू-काश्मीर राज्य केंद्रशासित आहे. त्याला पूर्ण राज्याचा दर्जा देणे आवश्यक असल्याची मागणी देखील राऊत यांनी केली.

What's Your Reaction?






