पालकमंत्र्यांच्या पोस्टरला प्रहार जनशक्तीकडून मिरच्यांची धुनी:कर्जमाफीवरील पालकमंत्र्यांच्या वक्तव्याचा केला निषेध
महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी रविवारी मोर्शी येथील एका कार्यक्रमात बोलताना शेतकऱ्यांच्या कर्जमाफी आंदोलनाला ‘नौटंकी’ म्हटल्याच्या निषेधार्थ प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आंदोलन केले. या वेळी महसूल मंत्र्यांच्या प्रतिमेला जोडे मारून संताप व्यक्त केला. तसेच या वेळी कार्यकर्त्यांनी मिरच्या जाळून त्या प्रतिकात्मक पोस्टला मिरचीची धुनी दिली. तसेच तीव्र नारेबाजी करण्यात आली. शेतकऱ्यांच्या वेदनेला ‘नौटंकी’ म्हणणे म्हणजे कष्टकरी शेतकऱ्यांच्या भावनांचा अनादर करणे आहे, हे सरकार शेतकरी विरोधी धोरण राबवत असल्याचे बावनकुळे वक्तव्यावरून स्पष्ट होत आहे. राजकारण्यांनी या वेदनेचा अपमान केला, तर त्या अपमानाचे उत्तर जनतेच्या रोषातून मिळेल. जो शेतकऱ्याचा अपमान करेल, तो जनतेच्या रोषाला सामोरे जाईल, असा इशारा प्रहारच्या कार्यकर्त्यांनी दिला. चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोर्शी येथे बोलताना काही लोक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर नौटंकी करत आहेत, असे वक्तव्य केले होते. त्यांनी थेट माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांचे नाव घेतले नाही, पण प्रहारच्या कार्यकर्त्यांनी या वक्तव्यावर आक्षेप घेतला. शेतकऱ्यांचा प्रश्न सर्वसामान्य लोकांचा प्रश्न आहे, पण भाजप सरकारने तो ‘नौटंकी’ आणि टिंगल टवाळी म्हणून दडपण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. निवडणुकीपूर्वी ‘सातबारा कोरा, कोरा, कोरा’ म्हणणारे आज शेतकऱ्यांकडून कर्जमाफीची तारीख विचारली की त्यांना मिरची झोंबते, आणि त्यांच्या आंदोलनाला अपमानित केले जाते, असे प्रहारच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे होते. तत्पूर्वी, प्रहारच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोडे मारो आंदोलन केले आणि मिरच्या जाळल्या. या आंदोलनाद्वारे शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी आवाज उठवणाऱ्यांचा संताप व्यक्त झाला असून खिल्ली उडवणारे आणि फसवणूक करणाऱ्यांचा निषेध करण्यात आला. बच्चू कडू यांच्या नेतृत्वात शेतकरी आंदोलन आता जिल्हानिहाय आणि अधिक तीव्र होत आहे. ही लढाई फक्त कर्जमाफीची नाही, ती शेतकऱ्याच्या अस्मितेची लढाई आहे, असे महानगर प्रमुख बंटी रामटेके यांनी सांगितले. या आंदोलनाच्या वेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे जितू दुधाने, महानगर प्रमुख बंटी रामटेके, प्रदेश सचिव नंदकिशोर कुयटे, संपर्क प्रमुख गोलू पाटील, अकबर भाई, अर्जुन अवशिकर, मनीष पवार, राजू परिसे, समर्थ डवरे, कुणाल खंडारे, शेषराव धुळे यांच्यासह महिला नेत्या मंजूषा बोडखे, अलका शहाणे, शुभांगी वाटाणे, पद्मा मेतकर, ललिता धुर्वे आदी उपस्थित होते. शेतकऱ्यांना खोटी आश्वासने देणाऱ्यांना पदावरून हटवा शेतकऱ्यांना खोटी आश्वासने देऊन फसवणे थांबवा. सातबारा कोरा, कोरा, कोरा, या घोषणेचा विसर पडलेल्या बावनकुळे यांना जबाबदार ठरवून मंत्रिमंडळातून हटवा, कर्जमाफी आणि हमीभावावर तत्काळ आणि स्पष्ट तारीख जाहीर करा, अशी मागणी प्रहारचे महानगर प्रमुख बंटी रामटेके यांच्यासह कार्यकर्त्यांनी केली.

What's Your Reaction?






