घोंगडी बैठक:मराठा आरक्षण लढ्यासाठी तडवळे सज्ज; मुंबई मोर्चात सहभागी होणार
मराठा समाजाला सगेसोयऱ्यासह कायद्याद्वारे सरसकट ओबीसी आरक्षण मिळावे, या प्रमुख मागणीसाठी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील २९ ऑगस्ट रोजी मुंबईत आमरण उपोषणास बसणार आहेत. या निर्णायक लढ्याला बार्शी तालुक्यातील तडवळे गावातून मोठ्या संख्येने मराठा समाज बांधव सहभागी होणार असून, संपूर्ण तालुक्यात गावोगाव घोंगडी बैठकींच्या माध्यमातून जोरदार तयारी सुरू आहे. मुंबईतील आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत आहे. याच बरोबर मुंबईला जाण्याचे नियोजनही या वेळी करण्यात येत आहे. तडवळे प्रत्येक टप्प्यावर अग्रेसर राहिले आहे. यापूर्वी झालेल्या कँडल मार्च, धरणे आंदोलन, प्रतिमा दहन, निषेध मोर्चा, यज्ञ अशा विविध उपक्रमांमध्ये गावाने सक्रीय सहभाग नोंदवला. राज्यात ऐतिहासिक ट्रॅक्टर मोर्चात सर्वाधिक ट्रॅक्टर तडवळे गावातीलच होते, याची नोंद ठेवली जाते. २९ ऑगस्ट लढ्याचा निर्णायक दिवस मुंबईमध्ये होणाऱ्या निर्णायक लढ्यासाठी तडवळे गावातून शेकडो मराठा बांधव उपस्थित राहणार आहेत. या लढ्याला केवळ आरक्षणाचा उद्देश नाही, तर मराठा समाजाच्या स्वाभिमानाचे पुनर्स्थापन करण्याचा प्रयत्न आहे. संघर्षाचा आवाज आता शिगेला पोहचला आहे, आणि या आवाजात तडवळे गावाचे योगदान पुन्हा एकदा उठून दिसत आहे.

What's Your Reaction?






