डोंगर दऱ्यांतील रानभाज्यांच्या आस्वादासाठी नगरकरांची झुंबड:"जनजाती कल्याण''च्या महोत्सवास प्रतिसाद, वनवासी व शहरी नागरिकांत दुवा साधणारा- जाधव
नगरकरांना शुद्ध गावरान व केमिकल विरहित विविध नैसर्गिक वनभाज्यांचा आस्वाद घेण्याची अनोखी मेजवानी मिळाली. या वनभाज्यांचा आस्वादासाठी शहरासह परिसरातील हजारो चोखंदळ नगरकरांची लांब रांग लाऊन झुंबड उडाली होती. निमित्त होते अहिल्यानगरच्या जनजाती कल्याण आश्रम आयोजित वनभाजी महोत्सवाचे. या महोत्सवात अकोले व रतनगड भागात डोंगर दऱ्यांमध्ये नैसर्गिकरित्या उगवणाऱ्या खुरासणी, पाथरी,चिलाची भाजी, करटुले भाजी, सराटा भाजी, तेरा भाजी व तांदुळजा अशा विविध रानभाज्या जनजाती कल्याण आश्रमाच्या वतीने अहिल्यानगर शहरातील नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या. तांदळाच्या व नाचणीच्या भाकरी बरोबर या रानभाज्यांचा आस्वाद घेत नगरकर सुखावले. या महोत्सवाला अपेक्षेपेक्षा उदंड प्रतिसाद मिळाल्याने दोन दिवस चालणारा हा महोत्सव संयोजकांना पहिल्या दिवशीच आवरता घ्यावा लागला. जनजाती कल्याण आश्रम अहिल्यानगर शाखेच्या वतीने आयोजित वनभाजी महोत्सवचे उद्घाटन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत संघचालक नानासाहेब जाधव यांच्या हस्ते झाले. यावेळी जनजाती कल्याण आश्रम अहिल्यानगर शाखेचे अध्यक्ष अरविंद पारगांवकर, सचिव अनंत पुंड, प्रांत सहसचिव महेंद्र जाखेटे उपस्थित होते. नानासाहेब जाधव म्हणाले, वनवासी समाजाच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन त्यांच्यात व शहरी समाजात फुट पाडून दरी निर्माण केली गेली. त्यामुळे वनवासी समाज प्रगती पासून दुरावला. पण जनजाती कल्याण आश्रमाच्या माध्यमातून ‘तू मै एक रक्त’ या ब्रिदाने ही दरी कमी करून त्यांना प्रवाहात आणण्याचे महत्त्वपूर्ण कार्य होत आहे. धर्मांतर केलेल्यांची पुन्हा घरवापसी होत आहे. वनभाजी महोत्सव हा वनवासी व शहरी नागरिक यांच्यात दुवा साधणारा व नातं घट्ट करणारा उपक्रम आहे. पारगावकर म्हणाले, अहिल्यानगर जनजाती कल्याण आश्रमाच्या वतीने वनभाजी महोत्सव ही नवी संकल्पना घेऊन नैसर्गिक न्युट्रीशन व व्हिटॅमिन युक्त रोगप्रतिकारक वनभाज्या नगरकरांसाठी प्रथमच उपलब्ध केल्या. या पहिल्याच उपक्रमाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. अकोले रतनगड भागात प्रचंड पाऊस सुरु असल्याने बऱ्याच रानभाज्या उपलब्ध होऊ शकल्या नाहीत. संस्थेचे सर्व पदाधिकाऱ्यांनी उत्कृष्ट नियोजन करून हा महोत्सव यशस्वी केला आहे. प्रास्ताविकात माजी सचिव डॉ.निळकंठ ठाकरे यांनी जनजाती कल्याण आश्रमाच्या कार्याची व उपक्रमांची सविस्तर माहिती दिली. रतनवाडी येथील सहभागी महिला श्रीमती वनिता झडे यांनी रानभाज्यांची माहिती व उपयोग सांगितले. प्रा.जयंत क्षीरसागर यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी जनजाती कल्याण आश्रमाचे मिलिंद मुळे, उमेश खिंदारे, प्रशांत आढाव,अनिल लवांडे, राजेंद्र डांगे, हरिश्चंद्र थिगळे, विशारद पेटकर, महिला कार्य प्रमुख डॉ.मैत्रेयी लिमये, विद्या पटवर्धन व कार्यकर्ते उपस्थित होते.

What's Your Reaction?






