राज्यातील 23 जिल्ह्यांसाठी पावसाचा यलो अलर्ट:मराठवाडा, विदर्भातही खबरदारीचा इशारा; 24 तासांत पावसाचा जोर वाढला
महाराष्ट्रात मान्सून पुन्हा एकदा सक्रिय झाला असून हवामान खात्याने राज्यातील 23 जिल्ह्यांसाठी पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. यामध्ये वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विशेषतः मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, कोल्हापूर, नाशिक, अहिल्या नगर, सोलापूर आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये आज पावसाचा जोर वाढला आहे. मुंबईत पहाटेपासूनच मुसळधार पाऊस सुरू झाला असून विशेषतः पश्चिम उपनगरांमध्ये – अंधेरी, बोरिवली, मालाड, कांदिवली आणि वांद्रे परिसरात जोरदार पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे अनेक भागांत रस्त्यांवर पाणी साचले असून वाहतूक कोंडीची स्थिती निर्माण झाली आहे. बेस्ट बस सेवा आणि लोकल सेवेवर ही परिणाम झाला असून नागरिकांनी प्रवास करताना खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, आजच्या दिवशी कोकणासह घाटमाथ्याच्या भागातही मुसळधार पावसाची शक्यता असून, काही ठिकाणी 60 ते 70 किमी प्रतितास वेगाने वारे वाहू शकतात. विजांचा कडकडाट आणि ढगफुटी सदृश्य स्थिती निर्माण होऊ शकते. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापन पथकांना सज्ज ठेवले असून पूरप्रवण भागांतील नागरिकांना अलर्टवर ठेवले आहे. मराठवाडा आणि विदर्भातही खबरदारीचा इशारा मराठवाडा आणि विदर्भातही लातूर, बीड, नांदेड, हिंगोली, चंद्रपूर, गोंदिया, यवतमाळ, नागपूर आदी जिल्ह्यांत पावसाची शक्यता असून शेतकऱ्यांनी पिकांचे नुकसान होऊ नये यासाठी खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. काही भागांतील नद्या, ओढे दुथडी भरून वाहत असून पूरसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गेल्या 24 तासांत पावसाचा जोर वाढला एकूणच, राज्यात मान्सून पुन्हा जोरात परतला असून गेल्या 24 तासांपासून पावसाचा जोर वाढला आहे. नागरिकांनी हवामान खात्याच्या सूचनांचे पालन करून अनावश्यक प्रवास टाळावा, विजांच्या गडगडाट दरम्यान झाडांच्या खाली किंवा उघड्यावर थांबू नये आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. 23 जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट मराठवाड्यात 10 दिवसांनी पाऊस, यवतमाळला वीज पडून 4 जण ठार गेल्या 8-10 दिवसांच्या खंडानंतर मराठवाड्यातील अनेक भागात मंगळवारी रात्री आणि पहाटे पावसाने हजेरी लावली. त्यामुळे सोयाबीन, कपाशी या पिकांना दिलासा मिळाला आहे. तर यवतमाळ जिल्ह्यात बुधवारी 5 ठिकाणी वीज पडून 4 जण ठार, 2 जखमी झाले. पंढरपूर शहर व परिसरात मंगळवारी रात्री व बुधवारी सकाळी दमदार पावसाने हजेरी लावली. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर शहरासह पैठण, नांदर आणि विहामांडवा या परिसरात दमदार पाऊस झाला. जालना, अंबड, घनसावंगी तालुक्यातील काही भागात अवघ्या 45 मिनिटांत 38 मिमी पावसाची नोंद झाली. तर बीड जिल्ह्यात तीन दिवसांचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. लातूर, नांदेड, परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यांमध्येही काही भागांमध्ये पाऊस झाल्याने उकाड्यातून दिलासा मिळाला. दरम्यान, मराठवाड्यात पुढील 2 दिवस तुरळक ठिकाणी जोरदार, तर मध्य महाराष्ट्रात गुरुवारी विजांच्या कडकडाटासह पाऊस होणार आहे.

What's Your Reaction?






