कलाकुसरीच्या राख्यांना पसंती, यंदा 5 टक्के भाववाढ:शहर, उपनगरातील बाजारपेठा सजल्या रंगीबेरंगी राख्यांनी, खरेदीसाठी महिला व युवतींची लगबग
बहिण-भावाच्या प्रेमाचा सण रक्षाबंधन अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे बाजारपेठ विविध प्रकारच्या राख्यांनी सजली आहे. भाऊ-बहिणीच्या नात्याचे प्रतिक असलेल्या राखी पौर्णिमेनिमित्त नगर शहरात व उपनगरांतील दुकानांमध्ये विविध प्रकारच्या राख्या विक्रीसाठी उपलब्ध झाल्या आहेत. मात्र गतवर्षीच्या तुलनेत यंदा वाढत्या महागाईमुळे राख्यांच्या किमतीत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या कापड बाजार, चितळे रोड, नवी पेठ, यांसह, उपनगरातील प्रोफेसर कॉलनी चौक, आकाशवाणी कार्यालयासमोर, प्रेमदान चौकाजवळ, गुलमोहोर रस्ता, पाईपलाईन रस्ता, भिस्तबाग चौक, पवननगर परिसर, बालिकाश्रम रोडवर रस्त्यालगत रंगीबेरंगी राख्यांची दुकाने थाटलेली दिसत आहेत. यामध्ये ५ रुपयांपासून १०० ते १२० रुपयांपर्यंतच्या राख्या विक्रीसाठी ठेवलेल्या आहेत. बाजारमधील विविध दुकानांमध्ये गोंडे, छोटा भीम, मेरे प्यारे भैय्या, ओम, स्वस्तिक, फॅन्सी जरी, घुंगरू, लाख, राजस्थानी मिरर वर्क, स्टोन राखी, काचेची सजावट असलेल्या राख्या विक्रीसाठी उपलब्ध आहेत. तसेच चांदीच्या राख्या व लहान मुलांना खास आकर्षण असलेल्या कार्टुन राख्यांमध्ये मोटू -पतलू, डोरेमॉनसह संगीत व लायटिंग असलेल्या राख्या ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत.कलाकुसरीने नटलेल्या राख्यांना यंदा विशेष मागणी आहे. शहर व उपनगरात राखी खरेदीसाठी महिला व युवतींची लगबग सुरू असल्याचे दिसत आहे. तसेच आपल्या लाडक्या बहिणीला भेटवस्तू घेण्यासाठी मुलांचीही पावले बाजारपेठेकडे वळत आहेत. त्यामुळे भेटवस्तूंनाही चांगली मागणी आहे. या राख्यांना आहे मागणी बाजारात विविध रंगांच्या व आकाराच्या आकर्षक राख्या उपलब्ध आहेत. त्यापैकी डायमंड डिझायनर, मुंबई स्टाइल, रेशीम वुलन गोंडा राखी, म्युझिक आणि लाइट राखी या प्रकारांसह कलाकुसरीच्या राख्यांना महिला व युवतींकडून यंदा सर्वाधिक मागणी आहे, असे विक्रेत्या संगीता काळे यांनी सांगितले.

What's Your Reaction?






