स्मार्ट मीटरमुळे वीजबिलामध्ये झपाट्याने वाढ:संतप्त महिलांची महावितरण कार्यालयात धडक
तालुक्यात महावितरणकडून नव्याने लावण्यात आलेल्या स्मार्ट मीटरमुळे वीज ग्राहकांवर आर्थिक ओझं वाढलं असून, महिलांमध्ये तीव्र संताप व्यक्त करत महावितरण कार्यालयाला घेराव घालत उपकार्यकारी अभियंता गणेश जाधव यांना निवेदन देण्यात आले. जुने मीटर असताना एका महिन्याचे सरासरी बिल तीनशे दरम्यान येत होते; परंतु स्मार्ट मीटर बसवल्यानंतर हेच बिल थेट चार हजारांपर्यंत पोहोचत असल्याच्या तक्रारी महिलांकडून जोरात करण्यात येत आहेत. दिवसाला मोलमजुरी करून अवघे दोनशे रुपये मिळवणाऱ्या कुटुंबांना आता महिन्याला सहा हजारांचे वीजबिल भरायचे कसं? असा सवाल महिलांनी थेट महाराष्ट्र सरकारला केला आहे. एकीकडे सरकार आम्हा लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये देत असल्याचा डंका पिटते आणि दुसरीकडे स्मार्ट मीटरच्या नावाखाली दुपटीने पैसे वसूल करते. हाच का महिलांसाठीचा विकास? असा संतप्त सवाल महिलांनी केला आहे. सध्या अनेक भागांमध्ये अनेकांना वाढीव बिल येत आहे. जर १५ आगस्टपर्यंत वीजबिल कमी न झाल्यास आम्ही रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करू, असा इशारा वीज ग्राहकांनी दिला आहे. निवेदन देताना सामाजिक कार्यकर्त्या जोशिला पगारिया व महिला उपस्थित होत्या. महावितरणने स्मार्ट मीटरची अचूकता तपासावी आणि गरजूंना योग्य दिलासा द्यावा, अशी मागणी आता जनतेतून होत आहे. तपासणी करूनच बसवले जाते स्मार्ट मीटर ^स्मार्ट मीटरची पूर्ण तपासणी करूनच बसवण्यात येत आहे. स्मार्ट मीटरमुळे ऑनलाइन पद्धतीने रीडिंग घेतली जाणार असल्याने वीज ग्राहकांना अचूक वीजबिल प्राप्त होईल. जे ग्राहक स्मार्ट मीटर बसवण्यास मज्जाव करीत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. -गणेश जाधव, उपकार्यकारी अभियंता, महावितरण, साक्री.

What's Your Reaction?






