पुस्तक वेडे "खोमणे' यांचे एक हजार पुस्तकांचे ग्रंथालय:विद्यार्थ्यांसाठी मोठी सुविधा, विविध पुस्तके असलेले विदर्भातील वैयक्तिक एकमेव ग्रंथालय
वाचन गंगा पंचक्रोशीत पोहोचवण्यासाठी येथील पुस्तक वेडे शिक्षक शेखर खोमणे यांनी एक हजाराच्यावर पुस्तकांचे ग्रंथालय स्वखर्चातून स्वत:च्या निवासस्थानी उभारले आहे. या ग्रंथालयात १२ संदर्भ ग्रंथ, वाक्याबलरीवर आधारित ५१ पुस्तकांचा संच, ३२ डिक्शनरी बरोबरच इंग्रजी व्याकरणाची विविध लेखकांची सुमारे ६० ग्रंथ व बच्चे कंपनीला लागणारी पुस्तके ठेवण्यात आली आहेत. अशा प्रकारची पुस्तके असलेले विदर्भातील वैयक्तिक एकमेव ग्रंथालय असावे. विद्यार्थ्यांना अस्सल डिक्शनरी हाताळण्याची सवय लागावी या विचाराने ग्रंथालयामध्ये डिक्शनरीज ठेवण्यात आल्या आहेत. या डिक्शनरीजचा वापर विद्यार्थी वर्षभर करत असतातच. परंतु १६ ऑक्टोबर रोजी वर्ल्ड डिक्शनरी डे साजरा करताना या डिक्शनरीजचा वापर वेगवेगळ्या स्पर्धा राबवण्यासाठी पिंपळगावराजा येथील जिल्हा परिषद हायस्कूल मधील विद्यार्थी करतात. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा शब्दसाठा वाढावा, याकरिता वॉकॅबलरी वर आधारित ५१ पुस्तकांचा संच व इंग्रजी व्याकरणाची विविध लेखकांची पुस्तके ग्रंथालयात आहेत. जुन्या आणि नवीन इंग्रजी कादंबऱ्या, मासिके, वार्षिकांक, शब्दकोश, संदर्भ ग्रंथ आदी पुस्तकांनी संपन्न असलेले हे एकमेव वैयक्तिक ग्रंथालय होय. शेक्सपियरच्या ३७ नाटकांचा संच म्हणजेच संपूर्ण शेक्सपियर हे शिक्षक खोमणे याच्या ग्रंथालयाचे एक वैशिष्ट्य होय. ही सर्व पुस्तके विद्यार्थ्यांना आपल्या घरी वाचनासाठी नेण्याचे स्वातंत्र्य आहे. रजिस्टर मध्ये आपले आणि पुस्तकाचे नाव नोंदवून विद्यार्थी संबंधित पुस्तक घरी नेऊ शकतात. ही विद्यार्थ्यांसाठी एक मोठी सुविधा आहे. जळगाव खान्देश येथील डॉ. अतुल सूर्यवंशी, गुंटूर येथील सेंट ॲन्स इंग्लिश स्कूलच्या प्राचार्य सिस्टर विमला, तसेच मुंबई येथील प्रसिद्ध आर्किटेक्ट विद्याधर जोशी, मैसूर येथील रामकृष्ण मठाचे संघटक स्वामी जितकामानंद आणि खामगाव येथील मुख्य अभियंता जितेंद्र काळे यांनी ग्रंथालयास भेट दिली. अलीकडेच भोपाळ येथील जी एस टी कमिशनर नवनीत कुमार यांनी ग्रंथालयास भेट देऊन त्यांना शाबासकीची थाप दिली. लंडन येथील प्रसिद्ध इंग्रजी भाषा विषय संशोधक डॉ. जेसन अँडरसन यांनी आपला फावला वेळ ग्रंथालयात व्यतीत केला. परिसरातील अभ्यासू विद्यार्थ्यांनी आपल्या या ग्रंथालयाचा लाभ घ्यावा, असे आवाहन शेखर खोमणे यांनी केले. ^ ग्रंथालय जोपासणे आणि वाढीस नेणे हे एक वेगळे आवाहन होय. मात्र वाचनाची मनापासून आवड असल्यामुळेच मागील १५ वर्षांपासून हे कार्य करीत आहे. विद्यार्थी पुस्तके घरी नेऊन काम झाले की प्रामाणिकपणे परत करतात, यातच मोठे समाधान आहे. पुस्तके हे कपाटात ठेवण्याची वस्तू नसून त्यांचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी वापर करावा यातच पुस्तकांची खरी उपयोगिता आहे. -शेखर खोमणे , शिक्षक पिंपळगावराजा

What's Your Reaction?






