अमरावतीमध्ये देखावे, नृत्यासह अस्मिता जपत सांस्कृतिक वैभवाचे घडवले दर्शन:जागतिक आदिवासी दिनानिमित्त आदिवासी बांधवांनी पारंपरिक वेशभूषेत काढली रॅली
जागतिक आदिवासी दिनानिमित्त शनिवारी अमरावती शहरात पारंपरिक थाटात आणि सांस्कृतिक वैभवाने नटलेली आदिवासी बांधवांनी रॅली काढली. राजकमल चौकातून सुरू झालेली ही रॅली नेहरू मैदानमार्गे राणी दुर्गावती चौकात आल्यावर समारोप करण्यात आला. रॅलीतून आदिवासी समाजाचा इतिहास, अस्मिता, संस्कृती आणि हक्कांची बुलंद साद उमटवली जाणारी फलके होती. रॅलीमध्ये पारंपरिक वेशभूषा, आदिवासी नृत्य, ढोल-ताशा तसेच महापुरुषांच्या झाक्या आकर्षणाचा केंद्रबिंदू होता. विशेषतः तंट्या मामा भिल्ल, बिरसा मुंडा, राणी दुर्गावती यांच्या जीवन गौरवावर आधारित देखावे, युवक-युवतींच्या पारंपरिक पोशाखातल्या सादरीकरणासह रॅलीत सांस्कृतिक समृद्धीचे दर्शन घडवणारे होते. ही रॅली केवळ एक शोभायात्रा नसून, शिक्षण, रोजगार, आरक्षण, वनहक्क, आरोग्य आणि विस्थापन यासारख्या आदिवासी समाजासमोरील ज्वलंत प्रश्नांवर जनजागृती करणारा एक लढ्याचा मंच आहे. रॅलीदरम्यान घोषणाबाजी, मुद्देसूद स्लोगन्स आणि सामाजिक प्रश्नांवर भाष्य करणारी फलके झळकली. जागतिक आदिवासी कृती समितीचे अर्जुन युवनाते यांनी माहिती देताना सांगितले, की ही रॅली नसून आपल्या लढ्याची मशाल आहे, अशा निर्धाराने रॅलीचे आयोजन केले होते. सामाजिक संघटना, तरुण- तरुणी, महिला, सामाजिक कार्यकर्त्यांचा सहभाग रॅलीत मोठ्या प्रमाणात दिसून आला. ही रॅली आदिवासी समाजाचे केवळ सांस्कृतिक प्रतिनिधित्व नसून, हक्कांसाठीच्या संघर्षाचा जिवंत साक्षात्कार ठरला. आदिवासी सांस्कृतिक कृती समितीचे अर्जुन युवनाते, संतोष वलके, विठ्ठल मरापे, दिनेश टेकाम, अग्नीलाल मावसकर, संजय सोळंके, रोहित झाकरडे, अतुल परतेकी, कमलेश युवनाते, ऋषिकेश लावरे, प्रतिभा करवाढ, अविनाश झामकर, नलिनी सिडाम, महानंदा टेकाम यांच्यासह समाज बांधव रॅलीत उपस्थित होते. पारंपरिक गोंडी रेला पाटा ठरले आकर्षण पारंपरिक गोंडी रेला पाटा हे वरुडवासीयांसाठी आकर्षण ठरले. मुलताई चौकातून (संविधान चौक) सुरू झालेल्या रॅलीची अष्टविनायक सभागृहात सांगता झाली. दरम्यान केदार चौकातील महात्मा फुले व छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून घोषणाबाजी केली. बिरसा क्रांती दलाचे जिल्हाध्यक्ष प्रा. कमलनारायण उईके यांनी जागतिक आदिवासी दिनाचे महत्त्व व गरज आपल्या मार्गदर्शनातून सांगितले. बिरसा क्रांती दल, ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉइज फेडरेशन, गोंडवाना गणतंत्र पार्टी, डॉ. मोतीरावन कंगाली कोल्हापूर बहुउद्देशीय संस्था, अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद व ग्रामदीप बहुउद्देशीय संस्था वरुड यांच्या संयुक्त परिश्रमातून कार्यक्रम पार पडला. युवक-युवतींसह रॅलीमध्ये या संघटनांचा होता सहभाग ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉइज फेडरेशन ऑल इंडिया, आदिवासी पिपल फेडरेशन, बिरसा क्रांती दल अमरावती, वीरांगना राणी दुर्गावती स्मारक समिती, हलबा-हलबी समाज संघटना, कोरकू समाज संघटना, अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद, भिमाल पेन ठाणा, छत्री तलाव अमरावती, जय वेळखन आदिवासी क्रांती संघटना, आदिवासी युवा क्रांती दल, आदिवासी पारधी विकास परिषद.

What's Your Reaction?






