वंदे भारत रेल्वेचा शुभारंभ, बडनेरा येथे 33 मिनिटे पोहोचली उशिरा:चेअरकारचे तिकीट 1905 तर एसी थ्री टायरचे तिकीट 3485 रुपये
अमरावती व बडनेरावासीयांसाठी रविवार, १० ऑगस्ट हा दिवस ऐतिहासिक ठरला. बडनेरामार्गे पुण्याला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा पंतप्रधानांच्या हस्ते दूरदृष्यप्रणालीद्वारे तर नागपुरातील अजनी रेल्वे स्थानकावरून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ करण्यात आला. अजनी स्थानकावरून ही ट्रेन प्रवाशांना १२ तासांत पुण्यात पोहोचवणार असून अतिशय आधुनिक व आरामदाय, एसी प्रवासाची यात सोय आहे. बडनेरा रेल्वे स्थानकावर वंदे भारतची निर्धारित वेळ दुपारी १ वाजून ३ मिनिटे आहे. मात्र, उद्घाटनीय वंदे भारत ३३ मिनिटे उशिरा अर्थात दु.१ वाजून ३६ मिनिटांनी स्थानकावर पोहोचली. या वेळी जनप्रतिनिधी, प्रवाशांनी उत्साहात ट्रेनचे स्वागत केले. काही मिनिटे थांबा घेऊन ती पुढच्या प्रवासाला निघाली. वंदे भारतच्या चेअरकारचे तिकीट १९०५ रुपये, तर एसी थ्री टायरचे तिकीट ३४८५ रुपये आहे. वंदे भारतला एकच एसी थ्री टायर कोच आहे. उर्वरित कोच एसी हे चेअरकार आहेत. बडनेराहून वंदे भारतला पुण्यात पोहोचण्यास १० तास लागणार आहेत. त्यामुळे १० तासांच्या प्रवासाकरिता एवढे मोठे रेल्वे भाडे द्यायचे की नाही, याचाही प्रवाशांना विचार करावा लागणार आहे. कारण, चेअरकारच्या तिकिटातच पुण्यासाठी एक्स्प्रेस रेल्वेचे स्लीपरची तीन तिकीटे खरेदी करता येतील.

What's Your Reaction?






