मनपा मनमानी पद्धतीने नागरिकांच्या मालमत्ता पाडू शकत नाही:विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचे मनपा प्रशासनाला खडेबोल
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या वतीने शहरात अतिक्रमण विरोधी कारवाई म्हणून अतिक्रमण हटाव कारवाई करण्यात येत आहे. मात्र अनेक नागरिकांनी वैध मालमत्ता सुद्धा अतिक्रमण म्हणून महानगरपालिका पाडत आहे. मनपा मनमानी पद्धतीने नागरिकांच्या मालमत्ता पाडू शकत नसल्याचे खडे बोल शिवसेना नेते तथा राज्याचे विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज बैठकीत प्रशासनाला सुनावले. महानगरपालिकेने किती वैध व अवैध मालमत्ता पाडल्या याची नोंद आहे का? शहर विकासासाठी म्हणून पाडलेल्या मालमत्तांना भरपाई कशा प्रकारे देणार असल्याचा जाब दानवे यांनी विचारला. या संदर्भात त्यांनी मनपा अधिकाऱ्यांची बैठक घेत त्यांची कानउघाडणी केली. शिवसेना प्रमुखांच्या स्मारकाची केली पाहणी एमजीएम परिसरात हिंदूहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचे होत असलेल्या भव्य स्मारक आणि संग्रहालयाची देखील त्यांनी पाहणी केली. स्मारकाचे आणि संग्रहालयाचे प्रलंबित काम तातडीने मार्गी लावण्याची सूचना यावेळी त्यांनी केली. पाणी आणि वादळ यामध्ये तग धरेल अशाप्रकारे मजबूत पुतळा उभारण्यात यावा. शिवसेनाप्रमुखांचा पुतळा कुठे तयार करण्यात येत आहे, याची दानवे यांनी माहिती घेतली. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना सदरील स्मारकास मुबलक निधी दिला. मात्र, महायुती सरकारचे शासन आल्यापासून निधीच्या अभावी स्मारकाचे काम प्रलंबित असल्याचा आरोप करत आगामी काळात प्रशासकीय आणि शासन स्तरावर असलेल्या प्रलंबित प्रक्रिया पूर्ण करून काम मार्गी लावण्याची सूचना अंबादास दानवे यांनी केली. रुग्णांशी संवाद साधत घाटीचा आढावा घाटी हे सर्वसामान्यांचे हक्काचे रुग्णालय आहेत, आलेल्या रुग्णांना दर्जेदार सुविधा द्या. प्रलंबित कामे आणि शासनाकडून निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे अंबादास दानवे यांनी सांगितले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी) येथे त्यांनी आढावा घेतला. विविध वॉर्डात जाऊन त्यांनी रुग्णांशी संवाद साधत आरोग्यसेवा जाणून घेतली. यावेळी घाटीचे अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांनी दानवे यांचे स्वागत करत कामकाजाची माहिती दिली. मराठवाडा, विदर्भ, खान्देश आदी भागातून रुग्ण मोठ्या येतात. सर्वसामान्य लोकांना चांगली आरोग्यसेवा मिळावी, चांगल्या दर्जाचे उपचार करण्याची सूचना दानवे यांनी केल्या.अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांनी घाटीत सुरु असलेल्या विविध विकासकामे, उपक्रमाची माहिती दिली. घाटी रुग्णालयात आलेल्या प्रत्येक रुग्णाला उत्तम सेवा देत असल्याने दानवे यांनी घाटीच्या कामाचे कौतुक केले.

What's Your Reaction?






