आता रोहित पवारांचे तोंड शिवले आहे का?:मारहाण प्रकरणावरून सदाभाऊ खोत यांचा सवाल, म्हणाले- राष्ट्रवादी पुरस्कृत गुंडागर्दी ठेचून काढावी
भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या सोलापूर येथील शरणू हांडे नामक एका कार्यकर्त्याला फिल्मी स्टाईलने अपहरण करून मारहाण करण्यात आली आहे. या प्रकरणावरून पडळकर यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर आरोप केले आहेत. तसेच त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची देखील मागणी केली आहे. अपहरण व मारहाण प्रकरणी अमित सुरवसे आणि त्याच्या साथीदारांना सोलापूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. रोहित पवार यांच्यावर आता आमदार सदाभाऊ खोत यांनीही टीका केली आहे. रोहित पवारांचे तोंड शिवले आहे का? असे म्हणत सदाभाऊ खोत यांनी टीका केली आहे. खोत म्हणाले, राष्ट्रवादीच्या रोहित पवारांच्या गुंडांनी गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्याचे अपहरण केले होते.अपहरणकर्ते कर्नाटकमध्ये आढळून आले असून सोलापूरचे पोलिस अधीक्षक आणि संपूर्ण पोलिस दलाचे मी अभिनंदन करतो. गुंडागर्दी कुठे चालते, अपहरण, खून, भ्रष्टाचार कशा पद्धतीने होतात याचे विद्यापीठ आता रोहित पवार चालवत आहेत. आता रोहित पवारांच्या तोंडावर बोट आहे का? रोहित पवारांचे तोंड शिवले आहे का? असा सवाल सदाभाऊ खोत यांनी केला आहे. पुढे बोलताना सदाभाऊ खोत म्हणाले, गोपीचंद पडळकरांच्या कार्यकर्त्यांवर हल्ला करणारा कार्यकर्ता कुणाचा? आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवरती हल्ला झाल्यानंतर त्याचा सत्कार रोहित पवार यांनी केला होता. त्यामुळे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातली राष्ट्रवादी पुरस्कृत आणि रोहित पवार समर्थक जी गुंडागर्दी आहे, त्याला ठेचून काढावी, अशी मागणी खोत यांनी केली आहे. दरम्यान, अपहरण व मारहाण प्रकरणी आमदार रोहित पवारांनी पत्रकार परिषद घेत स्पष्टीकरण दिले आहे. कुठलाही व्यक्तींनी कायदा व सुव्यवस्था हातात घेतली असेल, जर तो व्यक्ती आमचा कार्यकर्ता असेल तर त्याचे समर्थन आम्ही करत नाही. मी कोणाशी व्हिडिओ कॉल करत नाही, कोणाशी व्हिडिओ कॉलद्वारे बोलत नाही, तुम्ही यावर एसआयटीमार्फत तपास करा, तुमच्याकडे सरकार आहे, मी सरकारच्या विरोधात बोलतो, मंत्र्यांचे कारनामे समोर आणतो. त्यामुळे माझा आवाज दाबण्याचा या माध्यमातून प्रयत्न आहे. पण, मी शांत बसणार नाही.

What's Your Reaction?






