कुटुंबावर होणाऱ्या आरोपांमुळे मलाही वेदना:विकासाकडे लक्ष दिले तर जिल्ह्याचे चांगले होईल, रक्षा खडसेंचा महायुती सरकारला घरचा आहेर
पुण्यात काही दिवसांपूर्वी एका कथित रेव्ह पार्टीवर पोलिसांनी धाड टाकत कारवाई केली. या कारवाईत राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना अटक करण्यात आली आहे. गुरुवारी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी पत्रकार परिषद घेत या प्रकरणी खेवलकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यानंतर हे प्रकरण आणखीच चिघळले आहे. जावई प्रांजल खेवलकर यांच्या बचावासाठी एकनाथ खडसे तसेच प्रांजल यांच्या पत्नी व राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाच्या नेत्या रोहिणी खडसे या मैदानात उतरल्या आहेत. तर दुसरीकडून भाजपकडून एकनाथ खडसे व खडसे कुटुंबावर जोरदार हल्लाबोल करत आहेत. यात आता मंत्री रक्षा खडसे देखील उतरल्या आहेत. एकनाथ खडसे व खडसे कुटुंबावर होत असलेल्या आरोपांवरून भाजपच्या नेत्या व केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. सध्या जे काही सुरू आहे, त्याच्या वेदना मला सुद्धा होत आहेत, असे रक्षा खडसे म्हणाल्या. शेवटी राजकारण आहे, कशा पद्धतीने जाते आहे, हे तुम्ही सुद्धा बघत आहात, असे त्या म्हणाल्या. पुढे बोलताना रक्षा खडसे म्हणाल्या, जळगाव जिल्ह्यात या गोष्टी सुरू आहेत. त्या कशा पद्धतीने सुरू आहेत, या सर्वांना माहीत आहे. हे कुठेतरी थांबले पाहिजे. कोणीही नेता असो त्याने विकासावर भर दिला पाहिजे, अशी या जिल्ह्याची आणि मतदार संघाची लोकप्रतिनिधी म्हणून माझी प्रामाणिक इच्छा आहे. शेतकऱ्यांचे असतील किंवा विकासाचे असतील अनेक मुद्दे आहेत, त्याकडे कुणीही नेता असो त्याने लक्ष दिले तर जिल्ह्याचे चांगले होईल, असे म्हणत रक्षा खडसे यांनी एक प्रकारे भाजपच्या नेत्यांना घरचा आहेर देत नाराजी व्यक्त केली आहे.

What's Your Reaction?






